देवस्थान समित्यांवर दोन महिन्यांत कारवाई
By admin | Published: March 8, 2017 01:24 AM2017-03-08T01:24:13+5:302017-03-08T01:24:13+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान समित्यांच्या कारभारात अनियमितता आढळल्या पण त्या गंभीर नव्हत्या. आता सुरू असलेले लेखा परीक्षण आणि गंभीरता तपासणीचे काम येत्या दोन
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान समित्यांच्या कारभारात अनियमितता आढळल्या पण त्या गंभीर नव्हत्या. आता सुरू असलेले लेखा परीक्षण आणि गंभीरता तपासणीचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिले.
कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, श्री जोतिबा देवस्थानासह ३ हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या देवस्थान समितीने केलेल्या गैरव्यवहारांबाबतचा प्रश्न शिवसेनेचे संजय रायमूलकर, भरतशेठ गोगावले आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.
राष्ट्रवादीचे जयंत पाटील,कोल्हापूर जिल्ह्यातील सदस्य हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर या प्रश्नावर आक्रमक झाले. या गैरव्यवहारांबाबत चौकशी व कारवाईचे आश्वासन वर्षभरापूर्वी सभागृहात देऊनही ठोस कारवाई झाली नाही.लेखा परीक्षणाचा अहवाल आला त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर आला आहे.महागड्या गाड्यांची खरेदी करण्यात आली, असेही त्यात म्हटले आहे याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. या गैरव्यवहारांची चौकशी पूर्ण करून कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम काय तो सांगा, असा आग्रह भरतशेठ गोगावले यांनी भरला. समितीकडील ८ हजार एकर जमीन ७०० कोटी रुपयांत विकण्यात आली, हा पैसा कुठे गेला. समितीच्या जमिनीवर खाणकामासाठी मिळालेल्या रॉयल्टीची कोट्यवधी रुपयांची रक्कम हडपण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
राज्यमंत्री केसरकर यांनी वारंवार सांगितले की १९६९ ते २००७ पर्यंतचे समितीचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. उर्वरित वर्षांचे लेखापरीक्षणाचे काम सुरु आहे.
लेखा परीक्षण अहवालात गैरव्यवहार आढळला असेल तर त्याची गंभीरता तपासण्याची गरजच काय, सरकारने कारवाईबाबत घोषणा करावी, असा आग्रह जयंत पाटील यांनी धरला. सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल. एसआयटी वा अन्य यंत्रणांमार्फत चौकशीस त्यांनी नकार दिला.
विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार या प्रश्नावर आणखी बोलू इच्छित होते मात्र, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पुढचा प्रश्न पुकारला. (विशेष प्रतिनिधी)