कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
By Admin | Published: August 23, 2016 03:22 AM2016-08-23T03:22:50+5:302016-08-23T03:22:50+5:30
सुप्रीम कोर्टाने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनासंबंधी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे.
वसई : सुप्रीम कोर्टाने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनासंबंधी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी वसईतील दहीहंडी पथकांना दिला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पोलिसांपुढील आव्हाने वाढली आहेत. या निर्णयानंतर वसईतील सर्व पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीत दहीहंडी पथकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असा पोलिसांनी दिला आहे. कोर्टाने दहीहंडी उत्सवात १८ वर्षांखालील मुलांना सहभागी करून घेण्यास पूर्ण बंदी घातली आहे. तसेच वीस फूटांपर्यंत अर्थात चार थरांनाच परवानगी दिली आहे. या आदेशाविरोधात पडसाद उमटू लागले आहेत.
वसई विरार शहरातील अनेक मंडळांनी चार थरांपेक्षा जास्त थर लावण्याचा निर्धार केला आहे. काही राजकीय पक्षांनीही या निर्णयाला आव्हान देत दहीहंडी उत्सव जोरात करणार असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे पोलिसांपुढील जबाबादारी वाढली असल्याने वसईतल्या सर्वच्या सर्व म्हणजे सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहीहंडी आयोजकांच्या बैठका घेण्यात आल्या. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा असे आवाहन करतांना त्याचे उल्लघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात येत आहे.
दहीहंडी उत्सवात तरुणांचा सहभाग अधिक असल्याने अनेकदा त्यांच्याकडून गोंधळ घातला जातो. गोविंदा पथक शहरात फिरतांना धुडगूस घालतात, तसेच इतर रहिवाशांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे खास पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत. साध्या वेषातील पोलिसांचीही गस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती डीवायएसपी अनिल आकडे यांनी दिली. (प्रतिनिधी)