‘ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई’
By admin | Published: April 13, 2017 12:48 AM2017-04-13T00:48:05+5:302017-04-13T00:48:05+5:30
उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पोलिसांनी ध्वीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी
मुंबई: उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पोलिसांनी ध्वीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जानेवारी ते मार्च महिन्यात राज्यभरात एकूण १८५ केसेस नोंदवण्यात आल्या असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. तसेच तक्रारीसाठी मुंबई व ठाणे पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर ट्विटर अकाउंट सुरू केले असून मुंबई पोलिसांचे २७ लाख फॉलोअर असल्याची माहितीही सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.
बुधवारच्या सुनावणीत राज्य सरकारने मार्च महिन्यात नागरिकांनी केलेल्या तक्रारीची व कारवाईची आकडेवारी न्या. अभय ओक व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे सादर केली. जानेवारी ते मार्च या काळात राज्यभरातून एकूण २४३३ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापैकी २३८८ ठिकाणी पोलीस ध्वनीमापक यंत्रे घेऊन पोहचले. २००६ तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही. तर ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८५ केसेस नोंदवण्यात आल्या, अशी माहिती सरकारतर्फे ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली.
त्यावर खंडपीठाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोट्या तक्रारी दाखल करण्यात येतात का? अशी विचारणा कुंभकोणी यांच्याकडे केली. त्यावर कुंभकोणी यांनी पोलिसांना अनेक अडचणी येत असल्याचे खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)