पत्रकारांचा अवमान करणाऱ्या अकोला जिल्हाधिका-यांवर कारवाई होणार
By यदू जोशी | Published: January 4, 2019 12:45 AM2019-01-04T00:45:55+5:302019-01-04T00:46:12+5:30
अकोला येथील पत्रकारांना आपल्या शासकीय निवासस्थानी चहापानासाठी बोलावून त्यांना दूषित पाणी पाजणारे आणि घरात धूर करणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर राज्य शासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
मुंबई : अकोला येथील पत्रकारांना आपल्या शासकीय निवासस्थानी चहापानासाठी बोलावून त्यांना दूषित पाणी पाजणारे आणि घरात धूर करणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर राज्य शासनाकडून कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
अकोला शहरात मोर्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अकोल्यातील संपादक व पत्रकारांना चहापानासाठी बोलावून महोत्सवाला चांगली प्रसिद्धी न दिल्याबद्दलचा राग काढला. ज्या वृत्तपत्राने महोत्सवाला प्रसिद्धी दिली नव्हती त्याचे अंकही फाडले, पत्रकारांना गढूळ पाणी दिले आणि त्यांचा पाणउताराही केला. एवढेच नव्हे तर पत्रकारांना त्रास व्हावा म्हणून घरात धूर केला होता.
मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकते. नोटीसीचे उत्तर समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांच्या सर्व्हिस बूकमध्ये नोंदही होऊ शकते, असे राज्याचे मुख्य सचिवपद भूषविलेल्या एका निवृत्त सनदी अधिकाºयाने लोकमतला सांगितले.
सहभाग नव्हता तर वकीलपत्र घेतले कशाला?
मोर्णा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय अधिकाºयांनी आपले वजन वापरून सहयोग राशी गोळा करण्यास सहकार्य केले. ही बाब संपूर्ण अकोला शहरात चर्चेची होती. प्रत्यक्षात मात्र महोत्सव लोकसहभागातून साजरा झाल्याचे नाटक वठविण्यात आले. जर मोर्णा महोत्सव हा प्रशासनाचा उपक्रम नव्हता, तो मोर्णा फाउंडेशनचा उपक्रम होता, तर मग उत्सवाला अपेक्षित प्रसिद्धी न मिळाल्याबद्दल आयोजकांचे वकीलपत्र घेऊन जिल्हाधिकाºयांनी संपादक व पत्रकारांशी असा उद्दामपणा केला कशासाठी, असा प्रश्न आहे.