दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
By admin | Published: January 7, 2016 02:14 AM2016-01-07T02:14:33+5:302016-01-07T02:14:33+5:30
महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या ३० दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. काही कर्मचाऱ्याना पालिकेत रूजु होऊन २७ वर्षे तर काहींना ५ वर्षे झाली आहेत.
ठाणे : महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या ३० दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. काही कर्मचाऱ्याना पालिकेत रूजु होऊन २७ वर्षे तर काहींना ५ वर्षे झाली आहेत. पण त्यांनी अजूनही पालिकेचे तोंडच पाहिलेले नाही. त्यामुळे कामावर हजर न होणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची यादीच पालिका प्रशासनाने तयार केली असून त्यांना नोटीस देण्याचे काम आता सुरू केले आहे. वर्ग-३ आणि ४ श्रेणींतील हे सर्व कर्मचारी असून त्यांनी वेळेत प्रतिसाद न दिल्यास पुढची कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.
आधीच महापालिकेत विविध स्वरूपाची २४०० पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या या पदांमुळे पालिकेचा कारभार चालवणे प्रशासनाला कठीण जात असताना दुसरीकडे आस्थापनावर काम करणाऱ्या दांडीबहाद्दरांची संख्यादेखील मोठी आहे. ठाणे महापालिकेच्या हॉस्पिटल, प्रभाग समिती आणि इतर विभागांमध्ये विविध पदांवर कर्मचारी काम करतात. रिक्त पदे भरण्यासाठी कार्मिक विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये ३० कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे कार्यालयाचे तोंड बघितलेले नाही, असे दिसून आले. तर काही कर्मचारी ५ ते ६ वर्षे कामावर रुजू झालेले नाहीत. नर्स, लिपीक, शिपाई, वॉर्डबॉय अशा वर्ग-३ आणि ४ श्रेणींतील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यातच विविध संवर्गांतील २४०० पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर किंबहुना महापालिकेच्या अधिकारीकर्मचारीवर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असताना अशा दांडीबहाद्दरांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)