‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार
By Admin | Published: February 25, 2016 02:49 AM2016-02-25T02:49:28+5:302016-02-25T02:49:28+5:30
पोलीस कोठडी मृत्यूप्रकरणी वडाळ््याच्या आठ पोलिसांवर कारवाई करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती बुधवारी सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली.
मुंबई : पोलीस कोठडी मृत्यूप्रकरणी वडाळ््याच्या आठ पोलिसांवर कारवाई करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती बुधवारी सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. तसेच मार्चपर्यंत २५ पोलीस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्ही बसवण्यात येतील, अशीही माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.
वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दीड वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची व्याप्ती वाढवत उच्च न्यायालयाने राज्यात होणाऱ्या पोलीस कोठडी मृत्यूबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी वड्याळ््याच्या आठ पोलिसांवर कारवाई करण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. एका महिन्यात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही अॅड. देशमुख यांनी खंडपीठाला सांगितले.
खंडपीठाने कोठडी मृत्यूची कारणे आणि त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना आखण्याकरिता तीन सदस्यांची समिती नेमण्याचे आदेश सरकारला दिले. या समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)