एमएसआरडीसीवर होणार कारवाई
By Admin | Published: July 19, 2016 12:48 AM2016-07-19T00:48:06+5:302016-07-19T00:48:06+5:30
राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिले
पुणे : स्वारगेट चौकातील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार सूचना करूनही त्याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्याप्रकरणी राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
पावसाने रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी काम सुरू केले. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द केल्या. मात्र, जेधे चौकातील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचे निदर्शनास आले होते. शहराच्या विविध भागांतील खड्डे बुजविल्याचा सविस्तर अहवाल महापौरांनी मागविला आहे. शहरात कुठेही रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आल्यास त्याची महापालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जेधे चौकातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम एमएसआरडीसीकडे आहे. त्यांना वेळोवेळी खड्डे बुजविण्याची सूचना करण्यात आली होती. यासाठी त्यांना ५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. सोमवारी त्यांना दिलेली मुदत संपली तरी खड्डे बुजविण्यात न आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.