सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, अफवा पसरवणा-यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:15 AM2017-09-21T05:15:24+5:302017-09-21T05:15:26+5:30
मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली.
मुंबई : मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली. अफवांच्या या पावसामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र, मुंबईत असे कोणतेही वादळ धडकणार नसून, नागरिकांनी हा संदेश फॉरवर्ड करू नये आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नेटीझन्सना केले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानेही चक्रीवादळाची अफवा असल्याचे सांगितले, तरीही बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबईकरांच्या मनातील भीती कायम होती.
दुपारी ३ वाजता मुंबईत वादळ धडकले, तर अनर्थ घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक, पेडर रोड बंद ठेवण्यात आला आहे. सायन ब्रिजही बंद करून वाहनांना माघारी पाठविण्यात येत आहे. पावसामुळे वांद्रे ते सांताक्रुझपर्यंत एस. व्ही. मार्ग बंद आहे, अशा अनेक अफवांचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत होते. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. दुसरीकडे अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर लोकल बंद झाल्याचे संदेश आल्याने गोंधळ उडाला होता. मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोणीही घरातून बाहेर पडू नका, असे मेसेजेसही फिरत होते.
>चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे वांद्रे वरळी समुद्रसेतू मार्ग बंद केला आहे, अशा बातम्या सोशल मीडियावरून पसरवण्यात आल्या. पालिकेने याची गंभीर दखल घेतली असून हा संदेश पसरवणाºयांचा शोध सुरू केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, प्रकरण १०, कलम ५४ अंतर्गत खोटी माहिती देऊन मुंबईकरांमध्ये भीती निर्माण केल्याबद्दल कारवाईचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी सूचना आयुक्त अजय मेहता यांनी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांना केली आहे. दोषीला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.