महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मोनिका राजळे यांच्याविरुद्धचं बंड थंड; पंकजा मुंडेंच्या फिरकीने कार्यकर्ते गप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:44 PM2019-09-10T14:44:56+5:302019-09-10T14:46:43+5:30
Maharashtra Assembly Election 2019 : ढाकणे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंदाज बांधू नका, असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. यामुळे राजळे यांची उमेदवारी सध्या तरी सुरक्षित दिसत असून ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही अंशी पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते ऍड. प्रताप ढाकणे यांना भाजपकडून उमदेवारी द्यावी, या मागणीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्धच बंड अखेर शमले. उलट पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेत राजळे यांची उमेदवारी सुरक्षित असल्याचे संकेत दिले.
पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी १५० हून अधिक कार्यकर्ते परळीत दाखल झाले होते. शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून मोनिका राजळे यांच्या ऐवजी ऍड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्याकडे केली. यावर पंकजा म्हणाल्या की, तुम्ही ज्यांच्यासाठी उमेदवारी मागत आहात, ते माझ्या पक्षातच नाहीत. ते राष्ट्रवादीत आहे. आपल्या पक्षातच नाही, त्यांच्यासाठी उमेदवारी कशी मागता. ज्यांना हवी त्यांनी कधी मागितली नाही असं सांगताना मुंडे साहेब असताना ढाकणे राष्ट्रवादीत गेले होते. त्यांना कशी उमेदवारी देता येईल, असा सवालही मुंडे यांनी केला. तसेच ढाकणे यांना उमेदवारी देण्यावर नकार दर्शविला.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोनिका राजळे यांना उमेदवारी देऊ नका. त्यांच्यावर २५ टक्के कार्यकर्ते नाराज असल्याचा सूर लावला. त्यावर पंकजा यांनी मला यावर विचार करायला वेळ द्या, असं सांगितले. यावेळी त्यांनी ढाकणे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंदाज बांधू नका, असंही कार्यकर्त्यांना सुनावले. यामुळे राजळे यांची उमेदवारी सध्या तरी सुरक्षित दिसत असून ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही अंशी पूर्णविराम मिळाला आहे.