उल्हासनगर महापालिकेचा उपक्रम; उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम, नदी होतेय स्वच्छ
By सदानंद नाईक | Published: March 3, 2023 04:52 PM2023-03-03T16:52:24+5:302023-03-03T16:52:40+5:30
उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम
उल्हासनगर :
उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. जलपर्णी काढल्याने नदी पात्रातील उपसा केंद्र जलपर्णी मुक्त झाले असून नदीची स्वच्छ झाली आहे.
उल्हासनगर महापालिका पश्चिम व पूर्वेतील काही भागाला संच्युरी रेयॉन कंपनी जवळील उल्हास नदी पात्रातून उपसा केंद्राद्वारे एमआयडीसी पाणी उचलून पाणी पुरवठा करते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नदी पात्रात जलपर्णी पसरली असून नदीतील पाणी प्रदूषित झाल्याचे बोलले जाते. याच ठिकाणी शहरातील सांडपाणीचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीचे पाणी अधिकच प्रदूषित होत असल्याचा आरोप होत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी व शहरवासीयांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळण्यासाठी महापालिकेने नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांची यामागे संकल्पना असल्याचेही लेंगरेकर म्हणाले.
महापालिकेने नदी पात्रातील ७० टक्के जलपर्णी काढून टाकली असून यापुढे विशेष मोहीम सुरूच राहण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनीं दिले. या मोहिमेमुळे महापालिका हद्दीतील उल्हास नदी पात्र स्वच्छ झाले. मात्र शेजारील वरप, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदी पात्रातील जलपर्णी काढली जात असून ती पाण्याच्या प्रवाहात महापालिका हद्दीतील नदी पात्रात येत असल्याने, जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे. महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पावसाळा पर्यंत सुरू ठेवण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिका उपअभियंता दिपक ढोले, परमेश्वर बुडगे हे जलपर्णी काढण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करीत आहेत. नदी पात्रात नागरिक केरकचरा, जुने टाकावू साहित्य, प्लास्टिक पिशव्या व निर्माल्य टाकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. शहरवासीयांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी व नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदी पात्रात कोणताही टाकाऊ वस्तू टाकू नका. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.