बारावीच्या परीक्षेत आता तोंडीऐवजी ‘अॅक्टिव्हिटी शीट’, चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:36 AM2020-09-16T02:36:50+5:302020-09-16T02:37:09+5:30
बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी ८०/२० तर विज्ञान शाखेसाठी ७०/३० पॅटर्न कायम ठेवला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला आहे. व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनेला अधिक महत्त्व दिले आहे. तोंडी परीक्षेऐवजी आता उपयोजनात्मक चाचणी घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासूनच या आराखड्याची अंमलबजावणी होईल.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी ८०/२० तर विज्ञान शाखेसाठी ७०/३० पॅटर्न कायम ठेवला आहे. परंतु, तोंडी परीक्षाऐवजी आता ‘अॅक्टिव्हिटी शीट’च्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जातील. विद्यार्थ्यांनी घोकमपट्टी करून परीक्षेत उत्तरे लिहिण्याऐवजी वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करावे, यावर मूल्यमापन आराखडा तयार करताना लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यातही काही बदल केला आहे. यापूर्वी विचारल्या जाणाऱ्या एक, पाच आणि दहा गुणांच्या प्रश्नांऐवजी एक, दोन, तीन, चार, पाच गुणांचे प्रश्नसुद्धा विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांचे
प्रमाण सुमारे २५ टक्क्यांपर्यंत असणार आहे.
एखादा विषय कळणे, समजणे यापलीकडे जाऊन आता विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. त्यादृष्टीने मूल्यमापनात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. वाणिज्य शाखेतील काही विषयांसाठी विद्यार्थ्यांना केस स्टडीवर प्रश्न विचारले जातील.
- ज्योती गायकवाड, सदस्य, अभ्यासगट, बालभारती, पुणे