अभिनेत्या उमेदवारांच्या मालिकांना मिळाला ‘ग्रीन सिग्नल’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:52 PM2019-03-19T19:52:20+5:302019-03-19T19:59:47+5:30
विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या चित्रपट व मालिकांमुळे या उमेदवारांचा प्रचार होतो.त्यामुळे संबंधित मालिका बंद कराव्यात,अशी तक्रार निवडणूक अधिका-यांकडे केली जात आहे.
पुणे: लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात अनेक अभिनेते उतरले आहेत. मात्र,विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या चित्रपट व मालिकांमुळे या उमेदवारांचा प्रचार होतो.त्यामुळे संबंधित मालिका बंद कराव्यात,अशी तक्रार निवडणूक अधिका-यांकडे केली जात आहे.परंतु,शासकीय वाहिन्या वगळून खासगी वाहिन्यांवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या मालिका दाखवता येऊ शकतात,अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे शिरूर लोकसभेतून निडवणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासह सर्वच उमेदवार अभिनेत्यांच्या मालिका सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व सामान्य नागरिकांपासून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच आचासंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सी व्हिजील हे अॅप उपलब्ध करून दिले.या अॅपच्या माध्यमातून मंगळवारी अमोल कोल्हे यांच्या विषयीची तक्रार करण्यात आली.आचारसंहितेच्या काळात एका खासगी वाहिनीवरील मालिकेमुळे कोल्हे यांचा प्रचार होत आहे.त्यामुळे ही मालिका बंद करावी,असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. अॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारी 100 मिनिटात निकाली काढणे आवश्यक आहे.त्यामुळे कोल्हे यांच्याबाबत प्राप्त झालेली तक्रार तात्काळ आंबेगाव येथील निवडणूक अधिका-यांकडून निकाली काढण्यात आली.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आचार संहितेच्या नवीन निमयावतीनुसार एकादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची एखादी मालिका खासगी वाहिनीवर सुरू असेल तर ती थांबवता येणार नाही.मात्र, दूरदर्शन सारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका दाखवता येणार नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची मालिका आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार थांबवता येणार नाही. तसेच मंगळवारी सी व्हिजील अॅपवर प्राप्त झालेली कोल्हे यांची तक्रार निकाली काढण्यात आली आहे.
-----------------
अमोल कोल्हे यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.यांच्या उमेदवारीबाबतचे कोणतेही कागदपत्र जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज झाल्यानंतर त्यांच्याबाबत कोणती तक्रार आल्यास संबंधित तक्रारीचे स्वरूप पाहून त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल.
- रमेश काळे, अप्पर जिल्हाधिकारी, पुणे