राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू
By admin | Published: March 3, 2017 11:53 PM2017-03-03T23:53:55+5:302017-03-04T09:03:36+5:30
रंगभूमीवर नाट्यप्रयोग सादर करत असतानाच एका उमद्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. टिळक स्मारक रंगमंदिर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 03 - रंगभूमीवर नाट्यप्रयोग सादर करताना हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा असाच एक दु:खद प्रकार घडला आहे. टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरी दरम्यान सागर चौघुले या उमद्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अवघ्या ३८ वर्षांचा सागर हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा सख्खा भाचा असून त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’ हे नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच सागरचा मृत्यू झाला.
आज पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला. आज हा संघ ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ हे शाहू महाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करत होता. नाटकाच्या सुरवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमीकेत असलेल्या सागर चौघुले यांनी प्रक्षकांची वाहवा मिळविली होती. मात्र, नाटकाचा मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानात सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुना हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सागर हा मुळचा कोल्हापूरचा असून चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचा मुलगा आहे. त्याचा कोल्हापूरमध्ये जाहिरात क्षेत्राशी निगडीत व्यवसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन वयापासूनच तो नाटकांमध्ये भाग घेत होता. सहा महिन्यांपुर्वीच त्याने ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविले होते. तसेच काही चित्रपटांमध्येही त्याने काम केले होते त्यापैकी ‘सासू आली अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.