"१४ वर्षाचा वनवास संपला, जिथं रामराज्य..."; गोविंदानं हाती घेतलं 'धनुष्यबाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 05:17 PM2024-03-28T17:17:14+5:302024-03-28T17:18:06+5:30
कला आणि संस्कृती या विषयात मला काम करायचं आहे. आम्ही जी मुंबई बघायचो तेव्हापासून आता जास्त सुंदर आणि प्रगतीशील दिसतेय असं कौतुक अभिनेता गोविंदा यांनी केले.
मुंबई - Govinda joined Shivsena ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवजयंतीनिमित्त मी शिवसेनेत प्रवेश करतोय. माझा १४ वर्षाचा वनवास संपला असं म्हणत गोविंदानं त्यांची भावना व्यक्त केली.
अभिनेता गोविंदा म्हणाले की, मी २००४ ते २००९ सुरुवातीला राजकारणात होतो. बाहेर पडल्यावर कदाचित मी पुन्हा राजकारणात दिसणार नाही असं वाटलं. २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या वनवासानंतर जिथं रामराज्य आहे. त्याच पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत आलोय. आपल्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहे. मी प्रामाणिकपणे माझ्यावरील जबाबदारी पार पाडेन असं त्यांनी सांगितले.
तसेच गेल्या १४-१५ वर्षापासून मी राजकारणापासून लांब झालो होतो. शिवसेनेकडून मला मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे मी पार पाडेन. विरारमधून बाहेर पडलेल्या युवकाचं आज जगभरात नाव झालं आहे. सिनेतारकांना जगात मान देणारी ही भूमी आहे. कला आणि संस्कृती या विषयात मला काम करायचं आहे. आम्ही जी मुंबई बघायचो तेव्हापासून आता जास्त सुंदर आणि प्रगतीशील दिसतेय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आल्यापासून मुंबईच्या सौंदर्यात भर पडली आहे. सुशोभिकरणाची कामे, विकासाची कामे सुरू आहेत. माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंची कृपा कायम राहिली अशी आठवणही गोविंदा यांनी पक्षप्रवेशावेळी काढली.
दरम्यान, मुंबईत होत असलेल्या विकासकामांचा प्रभाव गोविंदा यांच्यावर पडला. महाराष्ट्रासह देशभरात विकासकामे सुरू आहेत. त्यातून सकारात्मक भावनेतून गोविंदा हे आपल्यासोबत आलेत. फिल्म इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. लाखो लोक त्यावर अवलंबून आहेत. या फिल्म इंडस्ट्रीसाठी गोविंदा यांना काम करायचं आहे. सरकार आणि फिल्म इंडस्ट्री यांच्यातील दुवा म्हणून गोविंदा काम करतील. कुठल्याही अटीशर्थीशिवाय ते शिवसेनेत प्रवेश करतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.