अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी
By Admin | Published: July 13, 2015 10:28 AM2015-07-13T10:28:24+5:302015-07-13T11:46:33+5:30
'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेत कल्याणीची भूमिका करणा-या जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - 'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेत सासूबाई 'आक्कासाहेब' यांच्या धाकाखाली वावरणारी 'कल्याणी' म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रत्यक्ष जीवनातही धाकाखाली व भीतीच्या सावटाखाली जगते आहे. आणि त्याचे कारण आहे तिला मिळालेले निनावी धमकीचे पत्र... '२० जुलै रोजी तू या जगात नसशील' अशी धमकी देणारे पत्र जुईला मिळाले असून सध्या ती प्रचंड तणावात आहे.
'पुढचं पाऊल' मालिकेमुळे घराघरात पोचलेल्या जुईला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच ( ८ जुलै) हे पत्र मिळाल्याने तिच्या आनंदावर विरजण पडले आहे. शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या जुईला एका लहान मुलाने हे पत्र आणून दिले आणि त्यात तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र हे पत्र नेमके कोणी पाठवले, का पाठवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान याप्रकरणी कर्जत पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.