अभिनेता पुष्कर जोगवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 12:52 AM2017-01-26T00:52:46+5:302017-01-26T00:52:46+5:30
जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षासह प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षासह प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांकडे आलेल्या तक्रार अर्जावरून बुधवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने चित्रपटक्षेत्रासह पुण्यात खळबळ उडाली आहे.
जोग एज्युकेशनच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, अभिनेता पुष्कर जोग, अमोल जोग, शुभदा अमोल जोग, शाळेच्या मुख्याध्यापिका विनीता पुरी, स्मिता साळवे आणि स्रेहा जोगळेकर यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नरेश गुलाब चव्हाण (वय ४४, रा. औंध) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील मयूर कॉलनीमध्ये जोग एज्युकेशनची कै. प्र. बा. जोग इंग्लिश मीडियम हायस्कूल आहे. त्या ठिकाणी नरेश चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. ते मागासवर्गीय असताना खुला प्रवर्गाचे असल्याची माहिती शासनाला पाठवली. हायस्कूलने २०१० पासून ही माहिती पाठवली. त्यांची पगारवाढ आणि प्रमोशन अडवून ठेवले. तसेच, त्यांना शासनाच्या विविध फायद्यांपासून वंचित ठेवले. त्यानंतर स्रेहा जोगळेकर यांच्या अदखलपात्र तक्रारीवरून २० आॅक्टोबर २०१५ मध्ये त्यांना हायस्कूलमधून निलंबित केले. त्यानंतर चौकशी समिती नेमून १३ एप्रिल २०१६ मध्ये त्यांना शाळेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर नरेश चव्हाण यांनी आवाज उठवला.