अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन
By admin | Published: January 18, 2015 10:56 PM2015-01-18T22:56:24+5:302015-01-18T22:56:24+5:30
अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़
कोल्हापूर : जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी नाडगोंडे यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे़ अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़ प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़़ बेबी शकुंतला यांनी यानंतर ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीच्या इतिहासाशी जोडणारा एक मोलाचा दुवाच हरपला आहे. पुत्र सुरेश नाडगोंडे-इनामदार यांनी बेबी शकुंतला यांच्या पार्थिवाला अग्नी दिला़ यावेळी शाहू कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे, आमदार संध्यादेवी कुपेकर, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, दिग्दर्शक यशवंत भालकर, सतीश रणदिवे, उद्योगपती सतीश घाटगे, श्रीकांत डिग्रजकर, अॅड़ अप्पासाहेब नाईक, मदन नाईक यांच्यासह बसर्गे गावातील ग्रामस्थांनी साश्रुनयनांनी शकुंतला यांना अखेरचा निरोप दिला़
मधुबाला आणि शकुंतला...
१९५० मध्ये ‘परदेस’ या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेतही त्यांनी मधुबालासोबत काम केले़ मधुबाला आणि बेबी शकुंतला यांच्या सौंदर्यामुळे या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला़