Ketaki Chitale: “पवार म्हणजे धर्म नाहीत”; वादग्रस्त फेसबुक पोस्टप्रकरणी केतकी चितळे स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:09 PM2022-07-05T13:09:44+5:302022-07-05T13:10:20+5:30

Ketaki Chitale: शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर स्पष्टीकरण देताना, केतकी चितळेने याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.

actress ketaki chitale clarification over objectionable facebook post on ncp chief sharad pawar | Ketaki Chitale: “पवार म्हणजे धर्म नाहीत”; वादग्रस्त फेसबुक पोस्टप्रकरणी केतकी चितळे स्पष्टच बोलली

Ketaki Chitale: “पवार म्हणजे धर्म नाहीत”; वादग्रस्त फेसबुक पोस्टप्रकरणी केतकी चितळे स्पष्टच बोलली

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) सध्या जामिनावर बाहेर आली आहे. या पोस्टप्रकरणी तिच्याविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका प्रकरणी केतकीला जामीन मिळाला आहे. मात्र, या पोस्टबाबत स्पष्टीकरण देताना केतकी चितळे हिने पुन्हा एकदा भाष्य करत, पवार म्हणजे धर्म नाहीत, असे म्हटले आहे. 

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारी केतकी चितळे ४१ दिवस कारागृहात होती. जामीन मिळाल्यानंतर तिच्या काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अटकेदरम्यान असभ्य वागणूक मिळाल्याबाबत तिने काही खुलासे केले होते. केवळ फेसबुकवर एक पोस्ट कॉपी-पेस्ट करुन स्वत:च्या प्रोफाइलवर अपलोड केल्याने मला तुरुंगामध्ये टाकण्यात आल्याचा दावा केतकीने केला. 

शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग फेकले

पोस्ट केल्यानंतर काही वेळांनी पोलीस माझ्या दारात उभे होते. त्यांनी मला ताब्यात घेऊन अटक केली. या साऱ्या गोंधळामध्ये २० ते २५ जणांनी माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारलं. शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग फेकले, माझ्यावर अंडी फेकण्यात आली. केवळ माझ्यावरच नाही तर त्यांनी पोलिसांवरही हे हल्ले केले. मी सध्या एका पोस्टसाठी करण्यात आलेल्या २२ एफआयआरविरोधात न्यायलयीन लढा देतेय. या २२ पैकी केवळ एका प्रकरणात मला जामीन मिळालाय, अजून २१ प्रकरणे बाकी आहेत, असे केतकी चितळेने सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

पवार म्हणजे धर्म नाहीत

सार्वजनिक दुष्प्रचार, बदनामी आणि विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे या प्रकरणांमध्ये केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे एवढे सगळे सहन करावे लागण्याइतके आपण काहीही केलेले नाही, असा दावा करत, मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतले तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या (पोस्टसाठी) तुरुंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत, अशी टीका केतकी चितळेने केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलां कार्यकर्त्यांकडून आणि जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोपही केतकीने केला आहे. २०-२५ जणांनी छेड काढल्याचा दावाही केतकी चितळेने केला आहे. माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात जोरात टपली मारली गेली. मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातला त्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी खेचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप केतकीने केला आहे. 
 

Web Title: actress ketaki chitale clarification over objectionable facebook post on ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.