रोगमुक्तीसाठी अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा मोठा वाटा, ९० हून अधिक डॉक्टर्सचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:52 AM2017-12-18T02:52:43+5:302017-12-18T02:52:52+5:30
लोकांना रोगमुक्त करण्यासाठी अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा मोठा वाटा आहे. ही पद्धत घराघरांत पोहोचविण्याचा विडा आता अॅक्युपंक्चर थेरपीतील तज्ज्ञांनी उचलला आहे. त्यासाठीच इंडियन इंटेग्रेटेड अॅक्युपंक्चर असोसिएशनतर्फे ‘नॅशनल सेमिनार आॅन अॅक्युपंक्चर २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील मेयर सभागृहात हे चर्चासत्र पाच दिवस सुरू राहणार आहे.
मुंबई : लोकांना रोगमुक्त करण्यासाठी अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा मोठा वाटा आहे. ही पद्धत घराघरांत पोहोचविण्याचा विडा आता अॅक्युपंक्चर थेरपीतील तज्ज्ञांनी उचलला आहे. त्यासाठीच इंडियन इंटेग्रेटेड अॅक्युपंक्चर असोसिएशनतर्फे ‘नॅशनल सेमिनार आॅन अॅक्युपंक्चर २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील मेयर सभागृहात हे चर्चासत्र पाच दिवस सुरू राहणार आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन चीनचे मुंबईतील उपउच्चायुक्त ली युआनलिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. यास्मिन बेरामजी, आयोजक सचिव डॉ. एल. एन. कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला लोकप्रिय करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील तब्बल ९०हून अधिक तज्ज्ञ चिकित्सक अॅक्युपंक्चर चिकित्साचे पद्धतीवर चर्चा करणार आहेत. या पाच दिवसीय सेमिनारमध्ये चिकित्सकांना अॅक्युपंक्चर चिकित्सेतील नव्या वाटा, त्यांना लागलेले नवे शोध यावर सखोल चर्चा होणार आहे. रुग्णांवर अॅक्युपंक्चर चिकित्सा करून त्यांना रोगमुक्त कसे करावे, यावरही प्रामुख्याने चर्चा होणार आहे. अॅक्युपंक्चरद्वारे कशा प्रकारे चिकित्सा केली जाते, केली जाऊ शकते, याचेदेखील प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला मोफत उपचार मिळावेत आणि रोगांपासून त्यांना मुक्ती मिळावी, यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे डॉ. एल. एन. कोठारी यांनी या वेळी सांगितले.
अॅक्युपंक्चर ही मूळची चायनिज चिकित्सा पद्धती आहे. चीनमध्ये जाऊन अॅक्युपंक्चरचे शिक्षण कसे घेता येऊ शकते, याबाबत चीनचे उपउच्चायुक्त ली युआनलिंग यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले. डॉ. एल. एन. कोठारी लिखित क्लिनिकल अॅक्युपंक्चर पुस्तक उपस्थितींना या वेळी देण्यात आले. पाच दिवस चालणाºया या चर्चासत्रात चिकित्सक डॉक्टरांना अॅक्युपंक्चर चिकित्सेबद्दलची इत्यंभूत माहिती देण्यासाठी, किरण फाळके आणि डॉ. मयंक शाह हेदेखील उपस्थित राहणार आहेत.