मनसे आंदोलनाचे तीव्र पडसाद
By admin | Published: September 15, 2016 03:54 AM2016-09-15T03:54:53+5:302016-09-15T03:54:53+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले. संतप्त विदर्भवाद्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘पोस्टर्स’ जाळली. स्वतंत्र विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असा निर्धार या वेळी विदर्भवाद्यांनी व्यक्त केला.
प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी कोअर कमिटी सदस्य अॅड. वामनराव चटप यांना धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ समितीचे कार्यकर्ते सकाळी नागपुरातील व्हेरायटी चौकात एकत्र आले. या वेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे, राज व उद्धव ठाकरे यांची ‘पोस्टर्स’ जाळण्यात आली. तसेच राज ठाकरे यांचा पुतळादेखील जाळण्यात आला.
या वेळी माजी खासदार व ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे,
अॅड. नंदा पराते व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. भंडारा येथेही राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. (प्रतिनिधी)
ही मुंबई नव्हे, विदर्भभूमी आहे
मनसे, शिवसेना यांचे अस्तित्व मुंबईपुरतेच मर्यादित आहे. मुंबई म्हणजे संपूर्ण राज्य होत नाही. जनतेच्या भावनांचा मनसे किंवा इतर कुठलाही पक्ष अपमान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा या वेळी विदर्भवाद्यांनी दिला.
राज ठाकरे यांना आव्हान
वेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे, असा समज मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा असल्यास त्यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी व निवडून यावे, असे आव्हान काटोलचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी दिले आहे.
आ. देशमुख यांनी दिलेले निवडणुकीचे आव्हान मनसेचे प्रशांत पवार यांनी स्वीकारले आहे. आ. देशमुख यांच्याविरोधात लढण्यासाठी राज ठाकरे यांची गरज नाही. त्यांचे कार्यकर्तेच सक्षम आहेत, देशमुख यांनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्याविरुद्ध लढतो, असे प्रशांत पवार यांनी स्पष्ट केले.
मनसेने जाळला विदर्भाचा झेंडा : विदर्भवाद्यांच्या आंदोलनानंतर मनसे कार्यकर्त्यांनीही दुपारी व्हेरायटी चौकातच ‘विदर्भवादी मुर्दाबाद’च्या घोषणा देत विदर्भवाद्यांचा झेंडा जाळला. अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या विदर्भवाद्यांना यापुढे मनसेतर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पक्षाचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी दिला.