‘अदानी’, ‘गोल्डन’चा खाद्यतेलाचा १ कोटीचा साठा ताब्यात

By admin | Published: October 22, 2015 01:13 AM2015-10-22T01:13:10+5:302015-10-22T01:16:43+5:30

दोघांवर गुन्हा : जिल्हा पुरवठा विभागाची धडक कारवाई; २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर छापे

'Adani', 'Goldman', stock of one crore worth of edible oil | ‘अदानी’, ‘गोल्डन’चा खाद्यतेलाचा १ कोटीचा साठा ताब्यात

‘अदानी’, ‘गोल्डन’चा खाद्यतेलाचा १ कोटीचा साठा ताब्यात

Next

कोल्हापूर : खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर बुधवारी छापे टाकले. त्यात अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील भाडेतत्त्वावरील गोदामात एकत्रित सुमारे १ कोटी रुपयांच्या खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा सापडला. पुरवठा कार्यालयाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत संबंधित कंपनींवर कारवाई करण्यासाठी या खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेतला. याबाबत या कंपनीसह गौतम अदानी (रा. अहमदाबाद, गुजरात आणि अमर पूनम भट, रा. टाकाळा, कोल्हापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक मनोज पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यांतर्गत जारी केलेल्या नियंत्रण आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून छापे टाकण्याची कारवाई करण्यात आली. त्यात उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या भाडेतत्त्वावरील गोदामावर छापा टाकला. या कंपनींकडून कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना खाद्यतेल, बेसन, वनस्पती तेल आणि तांदळाची विक्री केली जाते. या कंपन्यांचे दोन परवाने आहेत. त्याअंतर्गत त्यांना खाद्यतेलाचा एकत्रितपणे ६०० क्विंटलपर्यंत साठा करता येतो. मात्र, याठिकाणी छापा टाकल्यानंतर ११८६.४२ क्विंटल इतका खाद्यतेलाचा साठा आढळला. संबंधित खाद्यतेलाचा साठा अनुज्ञप्ती मर्यादेपेक्षा अतिरिक्त होता. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी संबंधित कंपन्यांचे गोदाम सील करण्यासह खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला. शिवाय या कंपन्यांवर जीवनावश्यक वस्तू ‘अधिनियम कलम ७’ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुरवठा कार्यालयाने दिवसभरात जिल्ह्णातील २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर छापे टाकले. मात्र, त्यात २९४ ठिकाणी मर्यादित साठा आढळून आला. या कारवाईने खळबळ उडाली. दरम्यान, अदानी विल्मर लिमिटेडचे विक्री प्रतिनिधी अमर भट्ट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी रत्नागिरी दौऱ्यावर असून कारवाई झाल्याचे समजले. याबाबत गुरुवारी सकाळी कंपनीतील अन्य सहकाऱ्यांकडून माहिती घेईन, स्टेटमेंट पाहीन त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. कंपनीचे गोदाम व्यवस्थापक शिवाजी बुराण यांनी या कारवाईची माहिती वरिष्ठांना दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
मॉल्समध्ये मर्यादित साठा
जिल्हा पुरवठा विभागाने कोल्हापुरातील सहा आणि इचलकरंजीतील दोन मॉल्सची अचानक तपासणी केली. त्यासह जिल्ह्णातील २९५ परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर छापे टाकले. यात राधानगरी तालुक्यात १२६ छापे, चंदगड १५, कागल ४०, शिरोळ ९, पन्हाळा १०, भुदरगड १४, शाहूवाडी ९, इचलकरंजी ८, कोल्हापूर शहर ११, हातकणंगले ९, करवीर १४, गडहिंग्लज ३० या छाप्यांचा समावेश आहे. मॉल्ससह तालुकानिहाय छापे टाकलेल्या ठिकाणी अतिरिक्त साठा आढळला नाही. या कारवाईमध्ये तहसीलदार योगेश खरमाटे, शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, पुरवठा निरीक्षक सतीश ढेंगे, करवीरचे पुरवठा निरीक्षक मनोज पाटील, अमोल बोलाईकर, अमर साळोखे, बाबासो माळी, आदींसह जिल्ह्णातील तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार यांनी कारवाई केली.
नागरिकांनी माहिती द्यावी
खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्णातील २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर बुधवारी छापे टाकले. यात अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथे अनुज्ञप्ती मर्यादेपेक्षा खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा आढळल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, खाद्यतेलाचा हा साठा सुमारे ९५ लाख रुपयांचा आहे. अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय ‘परवाना रद्द’ची कारवाई केली आहे. अदानी व गोल्डन या कंपन्यांची गोदामे वगळता छापा टाकलेल्या अन्य ठिकाणी खाद्यतेल, डाळींचा अतिरिक्त साठा आढळला नाही. जिल्ह्णात खाद्यतेल, डाळींचा अतिरिक्त साठा कुणी व्यापारी, वितरकाने ठेवल्याचे समजल्यास नागरिकांनी त्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला ०२३१-२६५५५७९ या क्रमांकावर द्यावी.



कंपनींकडून या तरतुदींचे उल्लंघन
जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र अनुसूचित वस्तू घाऊक व्यापार अनुज्ञाप्ती आदेश १९९८ च्या परिच्छेद दहा, अकरा व पंधरामधील तरतुदी. महाराष्ट्र डाळी, खाद्यतेल आणि खाद्यतेल बिया (साठा निर्बंध) आदेश २०१० च्या सुधारणा आदेशानुसार डाळी, खाद्यतेल बिया आणि खाद्यतेल (साठा निर्बंध) आदेश १९७७ च्या परिच्छेद चार. केंद्र सरकारकडील १८ आॅक्टोबर २०१५ साठा निर्बंधांबाबतची अधिसूचना. या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १८६६ च्या कलम ७ अन्वये संबंधित कंपनींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सांगितले.

कोल्हापुरात बुधवारी जिल्हा पुरवठा विभागाने साठेबाजीच्या संशयावरून परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर छापे टाकले. या अंतर्गत शहरातील मॉल्समध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, तहसीलदार योगेश खरमाटे खाद्यतेल, डाळी यांच्या साठ्यांची तपासणी केली.

Web Title: 'Adani', 'Goldman', stock of one crore worth of edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.