थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावा
By admin | Published: May 10, 2017 12:14 AM2017-05-10T00:14:22+5:302017-05-10T00:14:22+5:30
केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांच्या विकासाच्या बाता मारणाऱ्या थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगवा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांच्या विकासाच्या बाता मारणाऱ्या थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगवा, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मंगळवारी डोंबिवलीतील काँग्रेस सदस्य नोंदणी मेळाव्यात केले.
देशभर काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून कल्याण जिल्हा काँग्रेसच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडील कुडाळदेशकर सभागृहात सदस्य नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित मेळाव्यात चव्हाण बोलत होते.
चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचाराच्या काळात २७ गावांच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटी रूपये निधी देण्याची घोषणा केली होती. परंतु यातील एक पैसाही आजवर मिळालेला नाही. खुर्चीवर बसून केवळ विकासाच्या बाता मारल्या अशा थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगवा. ज्यांनी काँग्रेस पक्ष बुडवण्याचा विडा उचलला आहे तेच बुडणार असून आतापर्यंतचा इतिहास याला साक्षी आहे. काँग्रेस पक्षाला चांगली परंपरा असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही चव्हाण म्हणाले. आजच्या घडीला ज्या योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत त्या काँग्रेसच्या सत्ता काळातील आहेत, असे नमूद करुन चव्हाण म्हणाले की, सध्याच्या भाजपा सरकारने त्यांची फक्त नावे बदलली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी युतीने शहराची वाताहत केली असून स्मार्ट सिटी होणार म्हणून घोषणा केलेले हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत खाली घसरण्यास महापालिकेतील राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी संतोष केणे, गंगाराम शेलार, नंदू म्हात्रे, सदाशिव शेलार, शारदा पाटील, अमित म्हात्रे, दर्शना शेलार हे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस रस्त्यावर उतरणार-
महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांक डे झालेले दुर्लक्ष, शिवसेना भाजपा या राज्यकर्त्यांकडून नागरिकांची झालेली फसवणूक आदी मुद्दे घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी महापालिका कुठे नेऊन ठेवली याची प्रचिती स्वच्छतेत घसरलेल्या मानांकनावरून नागरिकांना आली असेल.
कल्याण- डोंबिवलीचे नागरीक सुजाण असल्याने आगामी निवडणुकीत ते युतीला धडा शिकवतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्ष नेहमीच मोठा राहिला असून यंदाच्या निवडणुकीतही तो तसाच राहिल, असा दावा त्यांनी केला.