माणूस जोडोे

By admin | Published: September 13, 2015 04:50 AM2015-09-13T04:50:21+5:302015-09-13T06:18:30+5:30

पावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी.

Add the guy | माणूस जोडोे

माणूस जोडोे

Next

- किशोर पाठक

पावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी. किती गंमत आहे पाहा! देव सगळेच आपापल्या पद्धतीने येतात. शंकर येतो सोमवारी बेलाची पानं पदरात टाकून जातो. खंडोबा येतो, देवी येते. नवरात्र उजळून टाकते. पण गणपतीचा तोरा काही वेगळाच. तो येतो नाद-निनादात. घरादाराला तर तो त्याच्या आगमनाची चाहूल देतोच, पण संपूर्ण गावाला तो आपलंसं करतो. माणसांमध्ये नवा संचार होतो. त्याचं हे वाजतगाजत येणंच महत्त्वाचं असतं. गणपती येतो तो हजारोंना रोजगार देऊन. हंड्या-झुंबरं, कलाबतू, आरास, दिवे, फुलं, नक्षी रिद्धी-सिद्धी, गौरी, रंगरंगोटी, रोषणाई, झगमगाट, जल्लोष गणपतीच्या नावाचा तऱ्हेतऱ्हेचा गजर हे सारं गणपती आणतो आणि वातावरण भारून टाकतो. बघा ना गणपती गावांना वैशिष्ट्य देतो. लालबागचा गणपती, दगडू हलवाई, मंडईचा गणपती, कसबा गणपती, नवश्या गणपती, चांदीचा गणपती, विविध महालांमध्ये विराजमान झालेला गणपती, कितीतरी प्रकार. म्हणजे गणपती देव एकच, पण तो सगळ्या गावांना, शहरांना बांधून ठेवतो. पुण्याचा गणपती पाहिला का, हा हमखास प्रश्न याच दिवसांत विचाराला जातो. सिद्धिविनायक पावला का, हाही असाच प्रश्न.
लोकमान्यांनी गणपती उत्सवास सार्वजनिक रूप दिलं, ते त्या काळी वेगळ्या हेतूने. तेव्हा राजकीय उत्थान, अभिसरण महत्त्वाचं होतं. आज ते जास्तीत जास्त सामाजिक होतंय. एक चैतन्य, वातावरण आनंदित करणारा गोंगाट हे तो देतो. काळाने बदल होत गेले. झगमगाट वाढला. लाइटच्या लाखो माळा झाल्या. त्यात डीजेच्या आवाजाने गणपतीचे लंबकर्णही बधिर झाले. माणसाचा उत्साह अपार. त्याला आपल्यापुरती आरती करायची नाही. त्याला आनंद वाटून वाढवायचा आहे. म्हणून शहरातही लांबवर असलेल्या औद्योगिक कंपन्या आपला गणपती गावात, चौकात बसवतात. यात समतेचा गजर नकळत होतो. कंपनीतला नोकरचाकर, चौकीदारही पूजेला बसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक यासाठी एकत्र येतात. तंटे, रुसवे-फुगवे वाढतात, तसे कमीही होतात. एक सांस्कृतिक वातावरण तयार होते. या निमित्ताने शाळा आणि विविध संस्था मिरवणुकीत मैदानी खेळ लेजीम पथक, बॅँडपथक, ढोलपथक तयार करून तरुणाईला आवाहन करतात.
हे सगळे गणपतीच देतो. अलीकडे आरास आणि देखणी उशिरापर्यंत चालणारी मिरवणूक हे वैशिष्ट्य होऊ पाहातेय. पण ते पाहाण्यासाठी लाखोंच्या संख्येने माणसं घराबाहेर पडताहेत. एकत्र येताहेत हे महत्त्वाचं. यानिमित्ताने विविध स्पर्धा, संमेलनं भरवली जातात. आपण या उत्सवाचं होकारार्थी रूप पाहू या. आपली परंपरा, संस्कृती याचा यथार्थ गौरव होतोय ना, हे महत्त्वाचं. शहरात यानिमित्ताने धार्मिक वातावरण होऊ पाहातं. त्यापेक्षाही सार्वत्रिक सौहार्द आणि सहिष्णुता दिसते, किंबहुना हाच प्रयत्न प्रत्येक सुजाण नागरिकाचा असतो आणि असावा. गणेशोत्सव जास्त हायटेक होतोय हे नक्की, पण तंत्र बदलते तसे त्याचे उपयोगही वाढताहेत. आजच्या काळात गणपतीलाही सेल्फी काढावीशी वाटली तरी ते कालसंगतच म्हणायला हवे. बदललेल्या गणेशोत्सवात माणूस उत्सवाशी, त्यातील सहआनंदाशी स्वत:ला जोडून घेतोय हेच महत्त्वाचे आणि हेच उत्सवाचे सामाजिक फलित आहे. यावर्षी मात्र बाप्पाला सांगायचं, बाप्पा, सोंडेत अडकला तरी चालेल पण जोरदार पाऊस येऊ दे!

Web Title: Add the guy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.