कणकवलीचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करा
By admin | Published: August 5, 2015 12:12 AM2015-08-05T00:12:01+5:302015-08-05T00:12:01+5:30
नीतेश राणे : मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कणकवली : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये कणकवलीचा समावेश करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कणकवली शहर हे आर्थिकदृष्ट्या विकसित होणारे आणि नाशिक शहरापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेले शहर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कणकवली हे महत्त्वपूर्ण शहर असून, स्मार्ट सिटी योजनेसाठी अग्रक्रमाने विचार करावा, असे आमदार राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.कणकवली शहराची लोकसंख्या १६ हजार ३५८ एवढी आहे. या शहराला लागून जानवली, कलमठ, हळवल, आशिये मठ, वागदे अशी गावे वसलेली आहेत. मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या कणकवली शहराला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे. या शहराची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, येथे अनेक सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या निर्माण होत आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.
तळकोकणातील कणकवली शहराचा या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यास शहराचा विकास अधिक जोमाने होईल. येथील जनतेला दर्जेदार नागरी सुविधा देता येतील. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी कणकवली शहराची शिफारस करावी, असे आमदार राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)