व्यसन हे वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक प्रश्न
By Admin | Published: October 25, 2015 02:22 AM2015-10-25T02:22:45+5:302015-10-25T02:22:45+5:30
शहरांपासून गावकुसापर्यंत, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सारेजण व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. दारू असो वा तंबाखू. ड्रग्ज असो अथवा सिगारेट. शरीरासाठी घातक
शहरांपासून गावकुसापर्यंत, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सारेजण व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. दारू असो वा तंबाखू. ड्रग्ज असो अथवा सिगारेट. शरीरासाठी घातक असतानाही त्याचे सेवन होत असते. अशा व्यसनींना वाळीत न टाकता, त्यांच्या व्यसनांमागील कारणे शोधून, ती दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ १९५८ सालापासून करत आहे. मधल्या काळात मरगळ आलेल्या या मंडळाने गेल्या काही वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबवत, व्यसनमुक्तीचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. ‘व्यसन हा एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न नसून, तो सामाजिक प्रश्न आहे. मात्र, तरीही राज्यात सरसकट दारूबंदी लागू करू नये,’ अशी भूमिका मंडळाने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, या भूमिकेमागील नेमके कारण काय? आणि राज्याला व्यसनमुक्तीकडे नेताना नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील? याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
जनतेकडून आपल्या
काय अपेक्षा आहेत?
खऱ्या अर्थाने व्यसनमुक्ती ही चळवळ म्हणून राबवण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे. त्यासाठी लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. लोकवर्गणीतून ही चळवळ उभी राहिल्यास, लवकरच राज्यात संपूर्ण व्यसनमुक्ती शक्य होईल. त्यासाठी व्यसनी व्यक्तींचे शोषण करण्याची गरज नाही. त्यांच्याशी संवाद न तोडता, मैत्री आणि प्रेमाने संवाद साधण्याची गरज आहे. आंतरिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केल्यास व्यसनमुक्ती सहज शक्य आहे.
शासनाकडून काही मदत होते का?
निश्चितच. मंडळाच्या मागणीवरून राज्य शासनाने २०११ साली व्यसनमुक्तीचे धोरण आखले. व्यसनमुक्तीचे धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. त्यात मंडळाने सुचविलेल्या ११ मुद्यांचा समावेश करण्यात आला. २०१२ साली मंडळाने पुरस्कार सोहळ््याला सुरूवात केली. त्यासही शासनाने मदत केली. या सोहळ््यातून व्यसनमुक्तीसाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यात येते. केवळ तालुकानिहाय अनुदान पोहचवण्यासाठी शासनाने अधिक निधीची तरतूद करण्याची गरज आहे. शिवाय तालुकानिहाय समुपदेशन केंद्रांची उभारणी करायला हवी. मादक पदार्थांवर कर आकारून व्यसनमुक्तीचे काम करायची गरज नाही. मादक पदार्थांवर टप्प्याटप्प्याने बंदी घालून महसूलासाठी इतर पदार्थांवर कर लादण्याची गरज आहे. कारण मादक पदार्थांच्या करातून मिळणाऱ्या निधीहून अधिक पैसा हा त्यातून होणाऱ्या परिणामांवर उपाययोजना करण्यात व्यर्थ जात आहे.
व्यसन हे प्रत्येक व्यक्ती त्याच्या मर्जीने करते. त्याचे दुष्परिणाम त्याच्याच शरिरावर होतात. मग तो सामाजिक प्रश्न कसा?
होय, एखादी व्यक्ती भले व्यसन त्याच्या मर्जीने करत असेल आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या शरीरावर होणार असेल, तरीही तो सामाजिक प्रश्न ठरतो. कारण गेल्या काही महिन्यांत दिल्ली, महालक्ष्मी आणि विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांमधील आरोपी हे व्यसनी असल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यसन करताना त्याचा दुष्परिणाम हा इतरांवर होत असतो. इतकेच नाही, तर घरात व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावरही मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या परिणाम होत असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती ‘व्यसन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे’ असा दावा करीत असेल, तर ते साफ चुकीचे आहे.
व्यसन हा सामाजिक प्रश्न आहे, तर मग ‘संपूर्ण राज्यात सरसकट दारूबंदी करू नये,’ अशी भूमिका घेण्यामागील नेमका अर्थ काय?
दारूबंदी म्हणजे व्यसनमुक्ती नव्हे. कारण गुटखा आणि सुगंधी सुपारीवर बंदी लादल्यानंतरही व्यसनाचे प्रमाण संपले नाही. उलट व्यसनाचे नवे पर्याय शोधण्यात आले. त्यामुळेच दारूबंदी हा व्यसनमुक्तीचा शेवटचा पर्याय आहे. उलट
दारूबंदी करण्याआधी तेथील व्यसनी लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी उपाययोजना करावी लागेल. त्यांचे अंतर वाढवले पाहिजे. त्याची उपलब्धता तोडावी लागेल. ज्या ठिकाणी दारूबंदी करायची आहे, तेथे समुपदेशन केंद्रांची उभारणी केली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दारूबंदी होऊ शकते, अन्यथा चोरट्या मार्गाने किंवा बनावट दारूविक्रीचे प्रकार सुरू होतात. त्याचा फटका संबंधित व्यसनी व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही बसतो. कारण चोरट्या मार्गाने खरेदी केलेली दारू कधीही महागच असते. बनावट दारूचे भयानक उदाहरण म्हणजेच नुकतेच मालाड मालवणीमध्ये घडलेले हत्याकांड होय.
कोणकोणत्या प्रकारची व्यसने केली जातात? त्यात मंडळासमोरील अडचणी कोणत्या?
तंबाखू हा व्यसनांमधील सर्वात मोठा किलर मानला जातो. कारण ९० टक्क्यांहून अधिक मृत्यू हे तंबाखूमुळे होतात. याशिवाय दारू, एमडी, मॅवमॅव, बटण, बुकी, स्पिरीट (व्हाईटनर) आणि अशा विविध नावांनी व्यसने सुरू आहेत. पाल, झुरळ मारल्यानंतर जाळून त्यात विशिष्ट पावडर एकजीव करून नशा करण्याचेही प्रमाण वाढत आहे. दरम्यानच्या काळात सर्पदंशाची नशाही अनेकांनी ऐकली असेल. अशा वेगवेगळ््या व्यसनांवर काम करण्यासाठी मंडळाला केवळ ३० लाख रुपयांचा निधी मिळतो. शिवाय व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या सुमारे ५५ सामाजिक संस्थांना मंडळाने एकत्र आणले आहे. त्यात मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबई परिसरात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे.
व्यसनाच्या आहारी जाणारे प्रामुख्याने कोणत्या वर्गातील आहेत? त्यामागील कारण काय?
प्रत्येक वर्ग आणि वयोगटातील व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामागील कारणेही वेगवेगळी आहेत. तणाव आणि सेलिब्रेशन हे व्यसनाच्या सुरुवातीचे कारण आहे. संवाद संपला की, व्यक्ती एकलकोंडी होते. परिणामी, तणावात आधार म्हणून आणि सेलिब्रेशनमध्ये मजा म्हणून व्यसनाकडे वळते. काही ठिकाणी मनाला थक्क करणारी कारणेही समोर आली आहेत. त्यात आनुवंशिकतेने, संस्कृती म्हणून, दबावातून आणि नाइलाज म्हणूनही व्यसनाच्या आहारी गेल्याचे निदर्शनास आले.
नाइलाज आणि संस्कृती म्हणून...?
होय, राज्यात काही ग्रामीण भागात आजही तंबाखू हा संस्कृती म्हणून दिला जातो. काही ठिकाणी पान आणि सुपारी देण्याची परंपरा आहे, तर काही समाजात लग्नसमारंभ आणि हळदीमध्ये दारूची पार्टी रंगते. याउलट रेल्वे स्थानके, रस्ते आणि डम्पिंग ग्राउंडशेजारी वाढणाऱ्या मुलांना भूक मारण्यासाठी व्यसनाचा आधार घ्यावा लागत आहे. कधी-कधी त्यांना संस्था चांगले अन्न देण्यास गेल्यास ते घेत नाही. कारण दररोज असे अन्न कुठून आणायचे, असा त्यांचा सवाल असतो. शिवाय गटारांत उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजही आधुनिक उपकरणांची व्यवस्था नसल्याने दुर्गंधीपासून वाचण्यासाठी ते व्यसनाचा आधार घेत असल्याचे काम करताना कळले.
व्यसनमुक्तीचे काम कशाप्रकारे चालते? मंडळाची एखादी यंत्रणा आहे का?
राज्यातील छोट्या शहरांत आणि ग्रामीण भागांमध्ये प्रचारक आणि संघटक नशामुक्तीच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करतात. संपूर्ण
राज्यात एकूण अडीच हजार संघटक आणि
४८ प्रचारकांची साखळी आहे. ते विविध कुटुंबांना भेटी देतात. त्यासाठी त्यांचे वर्षभराचे वेळापत्रक ठरलेले असते. प्रबोधन, चर्चासत्र, रॅली, भजन अशा विविध माध्यमांतून शाळा, महाविद्यालय आणि विभागांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. व्यसनी व्यक्तीला उपचार केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा प्राथमिक उद्देश असतो. त्यानंतर त्याला आवश्यक व्यसनाची उपलब्धता तोडली जाते आणि समुपदेशाच्या माध्यमातून नेमके कारण हेरून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
व्यसनमुक्तीसाठी सर्वोत्कृष्ट उपाय कोणता? म्हणजे एखादे औषध किंवा अन्य उपाय सांगाल का?
समुपदेशन आणि प्रेम हा व्यसनमुक्तीचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. टीव्ही आणि अन्य माध्यमांतून व्यसनमुक्तीसाठी दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती फसव्या असतात. अशा कोणत्याही प्रकारच्या औषधाने व्यसनमुक्ती शक्य नाही. केवळ आणि केवळ समुपदेशनाने काही दिवस किंवा महिन्यांत व्यसनमुक्ती करता येते. मात्र, समुपदेशनासोबतच व्यसनी व्यक्तीला पुरेपूर प्रेम देण्याची गरज असते. त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असते, तेव्हाच ती व्यक्ती पूर्णपणे व्यसनाला राम-राम करू शकते.
महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण कितपत आहे?
महिलांमध्ये म्हणण्यापेक्षा तरुणींमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. बदलत्या संस्कृतीचा हा परिणाम आहे. काही महाविद्यालयांमध्ये मंडळाने केलेल्या सर्वेक्षणातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या. ३७
टक्के मुली या फिगर मेन्टेन करण्यासाठी
सिगारेट ओढत असल्याचे कळले. याशिवाय
ग्रुपमध्ये टिकून राहण्यासाठी, इतर मुली आणि मुलांशी बरोबरी साधण्यासाठी मुली व्यसन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यात घातक म्हणजे मद्यपानाला हल्ली सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली आहे. त्यामुळे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठेची व्याख्या बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.
नक्की काय करावे लागेल?
समाजातील प्रतिष्ठित लोकांनी व्यसनमुक्तीसाठी पुढे येऊन आवाहन करण्याची गरज आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव हा नशाबंदी मंडळाचा बॅ्रण्ड अॅम्बेसिडर आहे. त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री प्रिया बापट, मकरंद अनासपुरे आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर हेही व्यसनमुक्तीच्या प्रचार आणि प्रसारात मोलाचे योगदान देत आहेत. शिवाय मंडळाने वाचनाच्या माध्यमातूनही जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी मंडळाने त्रैमासिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
मंडळांने सुरू केलेल्या नव्या उपक्रमांबाबत काय सांगाल?
व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांत तरुण वर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ‘व्हॅलेनटाईन डे’निमित्त निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचे आवाहन करणारा आगळावेगळा उपक्रम मंडळ राबवत आहे. गेल्या वेळी घोड्यावर स्वार झालेली तरुणी नरिमन पॉइंटवर हा संदेश देताना दिसली. दरम्यान, विशेष कार्यक्रमात तरुण-तरुणींनी निर्व्यसनी जोडीदार निवडण्याची शपथही घेतली. ३१ डिसेंबर साजरा करणाऱ्यांना परावृत्त करण्यासाठी मंडळातर्फे सीएसटी रेल्वे स्थानकापासून गेट वे आॅफ इंडियापर्यंत रॅलीही काढण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आधी
मंडळ एकाकीच काम करत होते. मात्र, काही
वर्षांपूर्वी मंडळाने व्यसनमुक्तीसाठी लढणाऱ्या विविध संघटनांना एकत्र आणले. अशा ५५ संघटनांची कृती समिती स्थापन करून नियोजनबद्ध कामाला सुरुवात केली.
(शब्दांकन - चेतन ननावरे)