नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:20 AM2024-10-20T06:20:27+5:302024-10-20T06:21:30+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर याबाबतची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना आता ते कमी होण्याऐवजी आणखी वाढणार आहे. कारण नववी, दहावी अभ्यासक्रमाच्या सात विषयांत अतिरिक्त तीन विषयांची भर पडणार आहे. या अतिरिक्त विषयांमुळे शाळांच्या वेळाही वाढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर याबाबतची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे.
सध्या नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना ७ ते ८ विषय आहेत; परंतु आता आराखड्यात बदल करण्यात आला आहे. त्यात अजून व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्या शाखा विषय बंधनकारक असणार आहेत, तसेच तीन भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने सामील केलेले हे तीन विषय असे दहा विषय असणार आहेत, तसेच स्काउट गाइडदेखील बंधनकारक आहे.
काय होणार?
- नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांचा समावेश सक्तीचा केला आहे. शाळांकडून सूचना आल्यानंतरच अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
- व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येणार आहे.
- दहावीला बागकाम, सुतारकाम परिचय यासारख्या व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे.
- कला शिक्षणातून दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला हे विषय शिकवण्यात येणार आहेत.