उन्हाच्या झळांबरोबरच पुणेकरांना वाहतूककोंडीचेही ‘चटके’
By admin | Published: April 5, 2016 01:00 AM2016-04-05T01:00:52+5:302016-04-05T01:00:52+5:30
एका बाजूला रखरखत्या उन्हामुळे शहरातून गाडी चालविणेही कठीण झालेल्या पुणेकरांना सोमवारी शहरातील प्रमुख रस्त्यावर ऐन दुपारी झालेल्या वाहतूककोंडीचाही मोठा फटका सहन करावा लागला.
पुणे : एका बाजूला रखरखत्या उन्हामुळे शहरातून गाडी चालविणेही कठीण झालेल्या पुणेकरांना सोमवारी शहरातील प्रमुख रस्त्यावर ऐन दुपारी झालेल्या वाहतूककोंडीचाही मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे अवघे अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास तासभर वेळ जात असल्याने पुणेकर घामांच्या धारांनी हैराण झाल्याचे दिसून आले. प्रामुख्याने आरटीओ कार्यालय, जुना बाजार चौक परिसरातील वाहतूक नियंत्रण दिवे बंद असल्याने मंगळवार पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ रस्ता, पुणे-मुंबई रस्ता, आरटीओ कार्यालयासमोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर संध्याकाळी जंगली महाराज, फर्ग्युसन रस्ता, आपटे रस्ता, शिवाजी रस्ताही कोंडीने गजबजला होता. विशेष म्हणजे ही कोंडी फोडण्यासाठी एका-एका चौकात चार ते पाच पोलिसांची नेमणूक केली असतानाही, वाहनचालक त्यांना न जुमानता लेन कटिंग करून विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतूककोंडीस जबाबदार ठरत असतानाही वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत हतबल झाल्याचे दिसून आले.
सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात रिक्षाचालकांचे आंदोलन असल्याने वाहतूक नियोजनासाठी या परिसरातील सिग्नल पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक पोलीसच चौकांचे नियोजन करताना दिसून येत होते. मात्र, वाहनचालक त्यांना जुमानत नसल्याचे चित्र सर्व चौकात होते. त्यामुळे पोलिसांनी थांबण्याचे आदेश देऊनही अनेक वाहनचालक सुरळीत वाहतुकीच्या मध्येच गाड्या घालून या कोंडीत भर घालताना दिसून आले. त्यामुळे गाडीतळ आणि आरटीओ चौकात झालेल्या कोंडीने काही वेळातच पुणे स्टेशन, रुबी हॉस्पिटल, पुणे विद्यापीठ तसेच मुंबईकडे जाणारा रस्ता आणि जुना बाजार रस्ता काही वेळातच ब्लॉक झाला. त्याचा परिणाम पुढे या रस्त्याला जोडणारे रस्तेही हळूहळू कोंडीने भरून गेले. जवळपास दोन ते तीन तास ही कोंडी ऐन दुपारी म्हणजे दीड ते साडेतीन या वेळेत झाली. त्यामुळे या कोंडीत अडकलेल्या नागरिकांना अक्षरश: उन्हाच्या चटके सहन करत ताटकळत राहावे लागले.