अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचे हृदयविकाराने निधन
By admin | Published: April 9, 2017 10:28 AM2017-04-09T10:28:38+5:302017-04-09T10:28:38+5:30
ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचे आज पहाटे नेरूळ येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 9 - ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचे आज पहाटे नेरूळ येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. अतिशय मनमिळावू आणि नेहमी हसतमुख असणारे प्रवीण शिंदे प्रशासनात लोकप्रिय अधिकारी होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शौर्यन, मुलगी सारा तसेच भाऊ आदी परिवार आहे. त्यांच्या आई-वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे.
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातले प्रवीण शिंदे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर ते राज्य सेवेत रुजू झाले. त्यांनी नाशिक येथून उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर ते एमआयडीसी, म्हाडा, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथेही होते. माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारला होता आणि आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.
प्रवीण शिंदे हे केवळ ठाण्यातच नव्हे तर सगळ्या प्रशासकीय वर्तुळात लोकप्रिय अधिकारी होते, महसूल विभाग, पोलीस, सहकार अशा सर्व ठिकाणी त्यांचा एक कार्यक्षम, मनमिळावू आणि हसतमुख अधिकारी म्हणून लौकिक होता.