अतिरिक्त आयुक्त वादाच्या भोवऱ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 03:23 AM2017-04-07T03:23:20+5:302017-04-07T03:23:20+5:30

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Additional Commissioner to the Bhopal? | अतिरिक्त आयुक्त वादाच्या भोवऱ्यात?

अतिरिक्त आयुक्त वादाच्या भोवऱ्यात?

Next


कल्याण : दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या विवरणपत्रात पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता त्यात नमूद न करता ती दडवल्याप्रकरणी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर सरकारच्या नगरविकास विभागाने केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर योग्य माहिती न दिल्याने घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करणे उचित होईल, असा अहवाल महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सरकारला दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची चिन्हे आहेत.
२ जून २०१४ च्या सरकार निर्णयानुसार वर्ग-४ वगळता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी मालमत्ता विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, घरत यांच्या पत्नी स्नेहल यांच्या नावे असलेल्या जमिनी आणि रिसॉर्ट कंपनीचा उल्लेख त्यांच्या मालमत्ता विवरणपत्रात नाही, अशी तक्रार तक्रार कल्याणमधील जागरुक नागरीक सुलेख डोण यांनी १९ जुलै २०१६ ला महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली होती.
त्यानुसार घरत यांनी सादर केलेले २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे मालमत्ता व दायित्व विवरणपत्राचे सीलबंद लखोटे ३० आॅगस्टला व्हीडीओग्राफीद्वारे आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत उघडण्यात आले. या लखोट्यात १३-१४ व १४ -१५ या वित्तीय वर्षाची आयकर विवरणपत्रे आढळली. आयकर विवरणपत्रे ही मालमत्ता दायित्व विवरणपत्रे नसल्याने घरत यांना यासंदर्भात १९ सप्टेंबरला नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी संबंधित वर्षाची सुधारित मालमत्ता व दायित्व विवरणपत्रे व १५-१६ या वित्तीय वर्षांची नियमित मालमत्ता व दायित्व विवरणपत्रे बंद लखोट्यात सादर केली होती.
दरम्यान, डोण यांनी २२ नोव्हेंबरला सरकारच्या नगरविकास विभागाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली. त्यावर सरकारने महापालिकेला मुद्येनिहाय सविस्तर अहवाल अभिप्रायासह विनाविलंब सादर करा, असे आदेश दिले होते. डोण यांच्या तक्रारीत तथ्य आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी घरत यांनी निवेदन सादर करावे, असे पत्र त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पाठवले होते. मात्र त्यांनी पत्रे स्वीकारली नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागाने सरकारला पाठवलेल्या अहवालात म्हंटले आहे.
दरम्यान, यासंदर्भात घरत यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.घरत यांच्यावर कुठली कारवाई होते याकडे पालिकेतील सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (प्रतिनिधी)
>तक्रारदाराने दिले पुरावे
तक्रारदार डोण यांनी संबंधित मालमत्तांबाबत सातबाराच्या उताऱ्यासह पुरावे दिले असताना घरत यांनी सादर केलेल्या तिन्ही वर्षांच्या मालमत्ता व दायित्व विवरणपत्रांमध्ये तक्रारीत नमूद केलेल्या मालमत्तांचा कोठेही उल्लेख केलेला नाही.
त्यामुळे घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणे उचित होईल, असा अभिप्राय महापालिकेने सरकारला पाठवलेल्या अहवालात दिला आहे.

Web Title: Additional Commissioner to the Bhopal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.