८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:42 AM2019-08-04T02:42:23+5:302019-08-04T06:46:37+5:30
शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०, ८५, ९० आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुंबई : शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०, ८५, ९० आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वय वर्षे ८० ते ८५ दरम्यान ज्यांचे वय आहे त्यांना मूळ निवृत्तीवेतनात १० टक्के, ८५ ते ९० वय असलेल्यांना १५ टक्के, ९० ते ९५ वय असलेल्यांना २० टक्के, ९५ ते १०० वय असलेल्यांना २५ टक्के आणि वय वर्षे १०० पेक्षा अधिक असलेल्या सेवानिवृत्तीधारकांना किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मूळ निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे.
अर्थ विभागाने वरील वय वर्षांच्या टप्प्यात सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त वाढीव निवृत्तीवेतन देण्याची कार्यवाही कशा पद्धतीने करावयाची आहे, वेतन आयोगाचे लाभ देताना कशाप्रकारे त्याची निश्चिती करावयाची आहे याची उदाहरणासह माहिती ३० तारखेच्या अध्यादेशात दिली आहे. ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या व ८० वर्षे व त्यापुढील निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहील.