अतिरिक्त शिक्षक मुंबईतच राहणार!
By admin | Published: September 19, 2016 05:30 AM2016-09-19T05:30:15+5:302016-09-19T05:30:15+5:30
मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक परिषदेला दिले आहे.
मुंबई : संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेल्या मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक परिषदेला दिले आहे. अतिरिक्त शिक्षकांचे पगार बंद होणार नाहीत, अशी स्पष्टोक्तीही तावडे यांनी दिली. अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर रविवारी तावडे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ही आश्वासने मिळाल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे.
शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन बंद होणार असल्याची चर्चा शिक्षकांत होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईसह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता निश्चिंत राहण्याचे आवाहनही त्यांनी परिषदेच्या मार्फत केले आहे. समायोजन प्रक्रियेत अन्याय झाल्यास शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे दाद मागावी. शिवाय नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांना अतिरिक्त दाखविल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे निर्देशही शिक्षण विभागाला दिल्याचे शिक्षणमंत्र्यांनी परिषदेला सांगितले. शिक्षक समायोजन प्रक्रियेत चांगल्या व घरानजीकच्या शाळा मिळविण्यासाठी गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आली होती. मात्र प्रक्रिया आॅनलाइन केल्याने समायोजनेत पारदर्शकता आली आहे. तरी यापुढे गैरव्यवहार होणार नाही, त्यामुळे शिक्षकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.