गोवरग्रस्त भागात अतिरिक्त लस; उद्रेकाचा परिसर कोणता, हे राज्य सरकार ठरविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:09 AM2022-11-24T09:09:02+5:302022-11-24T09:11:22+5:30
ज्या भागांमध्ये सहा ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवरबाधितांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तिथे या बाळांमध्ये गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी.
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत गोवराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले असून, काही ठिकाणी या आजाराचा उद्रेक झाला आहे. त्या भागांत उद्रेक प्रतिसाद लसीकरण करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला दिल्या आहेत.
या लसीकरणांतर्गत ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे तिथे नियमित लसीच्या नेहमीच्या डोसव्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी, असे सूचित करण्यात आले आहे. काेणत्या परिसरात उद्रेक झाला आहे, ते ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे. नीती आयोगाचे आरोग्य सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत देशातील गोवराच्या साथीचा आढावा घेण्यात आला.
निर्णय काय? -
- ज्या भागांमध्ये सहा ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवरबाधितांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तिथे या बाळांमध्ये गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी.
- या अतिरिक्त मात्रेनंतरही या बालकांचे गोवर आणि रुबेला लसीकरण नियमित वेळापत्रकानुसार करण्यात यावे.
भिवंडीतील आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू -
- पालिकेच्या माहितीनुसार, बुधवारी भिवंडी येथील आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचे लसीकरण अपूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.
- मुंबईत दिवसभरात गोवराच्या
१३ रुग्णांची नोंद झाली असून,
एकूण संख्या २३३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १२ मृत्यूंची नोंद झाली आहे.
- गोवराच्या नियंत्रणासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत, लसीकरणावर भर, समुपदेशन याद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.