"आंदोलन करणारे बदलापूरचे रहिवासी"; मुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांनी समोर आणला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:59 PM2024-08-22T13:59:31+5:302024-08-22T14:07:01+5:30

बदलापूरच्या ज्या आंदोलकांना अटक केली त्यांचे पत्ते बदलापूर येथील असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Addresses protesters who were arrested they are all common Badlapor residents says vijay wadettiwar | "आंदोलन करणारे बदलापूरचे रहिवासी"; मुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांनी समोर आणला पुरावा

"आंदोलन करणारे बदलापूरचे रहिवासी"; मुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांनी समोर आणला पुरावा

Badlapur School Crime : बदलापूरात १३ ऑगस्ट रोजी एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. आठवड्याभरानंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केलं. काही आंदोलकांनी ज्या शाळेत ही घटना घडली तिची तोडफोड केली. तर दुसरीकडे आंदोलकांच्या एका गटाने बदलापूर स्थानकात १० तास रेल्वेमार्ग रोखून धरला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पळवून लावलं. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असा आरोप केला होता. मुख्यमंत्र्‍यांच्या दाव्यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात घुसून रेल्वेवाहतूक तब्बल १० तास रोखून धरली होती. यावेळी नागरिकांकडून लाडकी बहीण योजनेचाही निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आंदोलकांमध्ये बदलापूर लोक नव्हते तर बाहेरुन गाड्या भरुन लोकांना तिथे आणले गेले असा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला होता. त्यावर आता विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत आंदोलनात अटक करण्यात आलेल्यांच्या नावाची यादी पोस्ट केली आहे.

"शिंदे- फडणवीस- अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह. बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"बदलापुरात झालेलं आंदोलन राजकीय दृष्या प्रेरित होतं. ८-९ तास आंदोलन सुरू होतं त्याला राजकीय पाठबळ होतं. स्थानिक कमी होते आणि इतर ठिकाणावरून गाडी भरून लोकं आंदोलनासाठी आणण्यात आले होते. सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव होता. तर आंदोलन ठिकाणी लाडकी बहीण कार्यक्रमाचे पोस्टर घेऊन आले होते. दोलनात लाडकी बहीण योजना नको, बहीण सुरक्षित पाहिजे, असं फलक लगेचच कसे आलेत? लाडकी बहीण योजना हे विरोधकांच्या जिव्हारी लागली आहे, त्यांचा पोटात दुखलंय हे बदलापूरच्या आंदोलनातून दिसून आलं," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
रक्षाबंधनामुळे मंगळावारी झाले आंदोलन

दरम्यान, अत्याचाराच्या घटनेविरोधातील आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी १० वाजता रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Addresses protesters who were arrested they are all common Badlapor residents says vijay wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.