‘शिव-शाहूं’च्या अभ्यासासाठी कर्नाटकात अध्यासन

By Admin | Published: March 18, 2017 12:33 AM2017-03-18T00:33:28+5:302017-03-18T00:33:28+5:30

मराठा समाजाचा होणार अभ्यास; धारवाडमधील मराठा विद्या प्रसारक मंडळाचा पाठपुरावा

Adhyasana in Karnataka for the study of Shiva-Shahu | ‘शिव-शाहूं’च्या अभ्यासासाठी कर्नाटकात अध्यासन

‘शिव-शाहूं’च्या अभ्यासासाठी कर्नाटकात अध्यासन

googlenewsNext

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी; शिवाय या कार्याबाबत नवसंशोधन व मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटकात ‘राजर्षी शाहू महाराज अध्यासन’ स्थापन होणार आहे. कर्नाटक विद्यापीठ (धारवाड)मध्ये हे अध्यासन स्थापन करण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली आहे. याबाबत मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
धारवाडमधील मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक मंडळाने कर्नाटक विद्यापीठामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी कर्नाटक सरकार आणि विद्यापीठाकडे केली होती. याबाबत गेल्या चार वर्षांपासून सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेत सरकारने बुधवारी (दि.१५) अर्थसंकल्पात संबंधित अध्यासन केंद्र स्थापनेची घोषणा केली. या अध्यासनाद्वारे छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य, मराठा रेजिमेंट, मराठा समाजाचे कर्नाटकातील आगमन, त्याचा इतिहास आणि मराठ्यांनी युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे, आदींबाबतचा अभ्यास, त्यावरील संशोधन केले जाणार आहे. त्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम होणार आहे.
दरम्यान, याबाबत मराठा विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष मनोहर मोरे यांनी सांगितले की, धारवाड विद्यापीठामध्ये या स्वरूपातील अभ्यासकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी मंडळ आणि कामगारमंत्री संतोष लाड, आमदार श्रीनिवास माने, आदींच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. त्याला आता यश मिळाले आहे. या अध्यासनासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या यासाठी कर्नाटक सरकारने पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे समजते.


शहाजी महाराजांच्या कर्नाटकातील समाधीचा जीर्णोद्धार
दावणगेरे तालुक्यातील होदेगेरे येथे छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. तिच्या जीर्णोद्धारासाठी सरकारने दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच या समाधीच्या परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. हा परिसर ‘प्रेरणास्थळ’ म्हणून विकसित केला जाणार असल्याची माहिती आमदार श्रीनिवास माने यांनी दिली. दरम्यान, बेळगावमध्ये १६ फेब्रुवारी रोजी सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. यात मराठा बांधवांनी होदेगेरे येथील छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने समाधीच्या जीर्णोद्धाराचा निर्णय जाहीर केल्याने मोर्चाला यश आले आहे.


मराठा संस्कृती, कार्याची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक न्यायाची भूमिका कर्नाटकातील मराठा आणि विविध समाजांतील तरुणाई, भावी पिढीमध्ये रुजावी या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज अध्यासनाची स्थापना होणार आहे. या अध्यासनामध्ये शिव-शाहूंच्या कार्याविषयी नवसंशोधन होईल. शिवाय मराठा समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरेचा अभ्यास केला जाणार आहे. या अध्यासनाला आवश्यक ती आर्थिक मदत देण्याची तयारी सरकारने केली आहे.
- श्रीनिवास माने, आमदार

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या राजर्षी शाहू चरित्राच्या कन्नड आवृत्तीचे महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने प्रकाशन केले. कानडी भाषेतील हा ग्रंथ आम्ही कर्नाटकातील विविध मंत्री, मान्यवरांना दिला. त्याचा सकारात्मक परिणाम या अध्यासनाच्या स्थापनेच्या माध्यमातून झाला आहे. प्रबोधिनीच्या माध्यमातून संबंधित अध्यासनाबाबत मदतीचा हात दिला जाईल.
- प्राचार्य आनंद मेणसे,
सामाजिक चळवळीचे अभ्यासक, बेळगाव

बहुजनांच्या विचारांचा विजय
कर्नाटकमध्ये राजर्षी शाहूंच्या नावाने होणाऱ्या अध्यासनाची स्थापना हा बहुजनांच्या विचारांचा विजय आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने राजर्षी शाहू चरित्र हे कन्नड भाषेमध्ये प्रकाशित केले. त्याची फलश्रुती म्हणजे हे अध्यासन आहे. राजर्षी शाहूंचे विचार अशा विविध माध्यमांतून महाराष्ट्राबाहेर रुजत असल्याचा आनंद होत आहे. शहाजी महाराज यांच्या होदेगेरेतील समाधी विकासाचा देखील चांगला निर्णय झाला आहे.
- डॉ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक

या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठाने पाच महिन्यांपूर्वी सरकारला प्रस्ताव सादर केला होता. त्याला अर्थसंकल्पाद्वारे सरकारने मंजुरी दिली. या अध्यासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य, मराठा समाजाचा इतिहास, आदींचा अभ्यास केला जाईल. पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू केले जातील.
- प्रा. महादेव जोशी,
कुलसचिव, कर्नाटक विद्यापीठ

Web Title: Adhyasana in Karnataka for the study of Shiva-Shahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.