ससाणे विरुद्ध आदिक राज्यात लक्षवेधी लढत
By admin | Published: October 27, 2016 04:12 PM2016-10-27T16:12:06+5:302016-10-27T16:12:06+5:30
माजी मंत्री, ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा विरुद्ध साई संस्थानचे माजी अध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांच्या
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर, दि. 27 - माजी मंत्री, ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा विरुद्ध साई संस्थानचे माजी अध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांच्या पत्नी राजश्री यांच्यात श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यातील लक्षवेधी लढत होणार आहे.
श्रीरामपूरचे नगराध्यक्ष पद महिलांसाठी आरक्षित आहे. अनुराधा सध्या महाराष्ट्र कूषक समाज संघाच्या अध्यक्षा आहेत. तर राजश्री ससाणे विद्यमान नगराध्यक्षा आहेत. त्या पंधरा वर्षापासून नगरसेविका आहेत. त्यातील दहा वर्षे नगराध्यक्षपद भूषविले आहे. राजकारणात पदारपण करणाऱ्या अनुराधा प्रथमच निवडणुकीस सामोऱ्या जात आहेत.
राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप,मनसे,रिपाइं, शिवसंग्राम या सर्वांनी महाआघाडी स्थापन करून अनुराधा आदिकांना पाठिंबा दिला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांनी आपल्या पत्नी दीपाली यांची उमेदवारी मागे घेतली. चित्ते यांनी प्रचारही सुरु केलेला होता. श्रीरामपूरमध्ये प्रथमच नगराध्यक्ष पदाची सरळ, दुरंगी लढत होणार असल्याने चुरशीची होईल. गोविंदराव आदिकांमुळे आपण मोठे झाल्याचे सांगणाऱ्या जयंत ससाणेंनी ही निवडणूक बिनविरोध घडवून अनुराधा यांना नगराध्यक्षपदी सन्मानाने बसवावे, अशी सूचना राज्य पणन मंडळाचे संचालक दीपक पटारे यांनी केली आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही आपण मुलगी म्हणून अनुराधा यांना सर्व मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. अनुराधा यांनी गुरुवारी महाआघाडीतरफे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राकाँचे सिद्धार्थ मुरकुटे, भाजपचे चित्ते, काँग्रेसचे विखे समर्थक दीपक पटारे, गिरीधर आसने, सेनेचे सचिन बडदे, डॉ. महेश क्षीरसागर, रिपाइंचे भीमा बागुल आदी हजर होते.