लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:16 PM2024-12-11T22:16:43+5:302024-12-11T22:19:12+5:30
Aditi Tatkare : माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक पत्रक काढून अदिती तटकरे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांना भरभरुन यश मिळाले. निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या निषकांमध्ये आता बदल केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक मेसेजही फिरत आहेत. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा तपासले जातील, अनेक महिलांचे अर्ज रद्द होतील असे काही व्हिडीओ आणि रील्स व्हायरल झाले होते. त्यावर आता माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक पत्रक काढून अदिती तटकरे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हे पत्रक शेअर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास… pic.twitter.com/mtOnnIAWNo
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 11, 2024
याचबरोबर, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये अशी विनंतीही अदिती तटकरे यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मिळत आहे. या योजनेत राज्य सरकारकडून पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे.