आदित्य विरुद्ध अमित!
By admin | Published: August 13, 2015 02:51 AM2015-08-13T02:51:55+5:302015-08-13T02:51:55+5:30
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण युवक सेनेचे नेतृत्व राज यांचे पुत्र अमित यांच्याकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार, अशा चर्चेला ऊत आला असतानाच अगोदर उद्धव यांनी व त्यानंतर राज यांनी या वावड्या असल्याचे स्पष्ट केल्याने येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत या ठाकरे बंधूंचा सामना होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीपासून महापालिका निवडणुकीपर्यंत आदित्य व अमित या दोन ज्युनिअर ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवक सेनांचा सामनाही अटळ असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
आदित्य शिरोडकर हे मनसेच्या युवक सेनेचे प्रमुख होते. फेरबदलात त्यांना पक्षाचे सरचिटणीस केल्याने आता युवक सेनेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यापूर्वी प्रचाराच्या रोड शोमध्ये केवळ सामील झालेले व विधानसभा निवडणूक निकालानंतर मतदारसंघांत फिरून पराभवाची चाचपणी केलेले अमित ठाकरे हे लवकरच या पदाची सूत्रे स्वीकारतील.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. त्यानंतर कल्याण-डोंबिवली, मुंबई या महापालिकांत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रचार करतील. आदित्य हे अनेकदा टिष्ट्वटर
व अन्य माध्यमातून विरोधकांचा समाचार घेत असतात. राज यांचा सामना उद्धव यांच्याशी असल्याने आदित्य यांचा सामना यापुढे अमित करतील. (विशेष प्रतिनिधी)
मनसेत झाला फेरबदल
मनसेच्या फेरबदलात ‘नेता’ हे नवे पद निर्माण केले गेले आहे. बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना या पदावर नियुक्त करताना शिरीष पारकर यांचा नेत्यांच्या यादीत समावेश न झाल्याने सध्या काहीसे दूर असलेले पारकर मनसेपासून दुरावल्याची चर्चा आहे. शिल्पा सरपोतदार यांचाही या यादीत कुठेच समावेश नसल्याने तसेच त्यांचा पुत्र युवासेनेत दाखल झाल्याने त्यांनाही मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.