‘आदित्य’हट्टाची किंमत २ हजार कोटी!
By admin | Published: July 16, 2015 01:51 AM2015-07-16T01:51:23+5:302015-07-16T01:51:23+5:30
राज्यातील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ७५ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये किमतीचे टॅब देण्याची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मागणी मंजूर करायची
मुंबई : राज्यातील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ७५ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये किमतीचे टॅब देण्याची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मागणी मंजूर करायची तर राज्याच्या तिजोरीवर २ हजार २२५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आदित्य यांनी बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना टॅब देण्याची मागणी केली.
शिवसेनेने आपल्या वचननाम्यात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या पूर्ततेचे पहिले पाऊल म्हणून शिवसेनेने दादरच्या बालमोहन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप केले. आता राज्यातील १ कोटी ८५ लाख विद्यार्थ्यांपैकी सहावी ते दहावीच्या ७५ लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची मागणी ठाकरे यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली. याबाबत तावडे यांना विचारले असता ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना टॅब देणे याकडे केवळ दप्तराचे वजन कमी करणे एवढ्या मर्यादित हेतूने पाहत नाही. टॅब हा ई-लर्निंगचा पुढचा टप्पा आहे. बालभारती व पाठ्यपुस्तके ई-स्वरूपात उपलब्ध करून देण्याकरिता शिक्षण विभागाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीची यापूर्वीच नियुक्ती केली. शिक्षण सचिवांना यापूर्वीच टॅबची निर्मिती करणाऱ्या तीन-चार कंपन्यांनी सादरीकरण केले आहे. सध्या पाठ्यपुस्तके छपाईकरिता शिक्षण विभागाला दरवर्षी २५० कोटी रुपये खर्च येतो. विद्यार्थ्यांना दिले जाणारे टॅब पाच वर्षे वापरायोग्य राहणार असतील तर सर्व पाठ्यपुस्तके व बालभारती त्यामध्ये देणे शक्य आहे.
तावडेंनी टॅब देण्यास नकार
दिला नसला तरी किंमत व विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता कोट्यवधींचा बोजा आहे हे शिक्षण विभागाचे अधिकारी मान्य
करतात. (विशेष प्रतिनिधी)