आदित्य पांचोलीला कारावास
By admin | Published: November 6, 2016 02:14 AM2016-11-06T02:14:53+5:302016-11-06T02:14:53+5:30
सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीला शेजाऱ्याला मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल ११ वर्षांनी केसचा निकाल देत अंधेरी
मुंबई : सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीला शेजाऱ्याला मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल ११ वर्षांनी केसचा निकाल देत अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी आदित्य पांचोलीला एक वर्षाची कारवासाची शिक्षा व २० हजार रुपये दंड ठोठावला. मात्र आदित्य पांचोली दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्याची तातडीने जामिनावर सुटका केली. त्यामुळे त्याची जेलवारी टळली आहे.
अंधेरीचे दंडाधिकारी अमिताभ पंचभाई यांनी आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आदित्य पांचोली या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याने दंडाधिकाऱ्यांनी पांचोलीची १२ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. आदित्यच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार त्याच्या सोसायटीत भाड्याने राहात होता. त्यामुळे त्याच्याविषयी पांचोलीला काहीही माहीत नाही. एके दिवशी पांचोलीचा मित्र त्याला भेटायला आला. त्याला पार्किंगची एक जागा रिकामी दिसल्याने त्याने त्या ठिकाणी त्याची गाडी पार्क केली. थोड्या वेळाने तक्रारदार त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याच ठिकाणी त्याची गाडी पार्क करून पांचोलीच्या गाडीचा रस्ता बंद केला. त्यामुळे त्याच्या मित्राची गाडी बाहेर येऊ शकत नव्हती. मित्राच्या मदतीसाठी पांचोली खाली धावत आला. बाचाबाची झाल्यावर तक्रारदाराने थेट त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला.
तक्रारदाराने पूर्ण विचार करूनच आपल्यावर गुन्हा नोंदवला. अन्यथा त्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार केली नसती, असा युक्तिवाद आदित्यच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांपुढे केला. तर तक्रारदाराने आदित्य पांचोलीने मारहाण केल्याचा दावा केला आहे. आदित्यने मारहाण केल्याने फ्रॅक्चर झाले तसेच नाकातून रक्तही आले. सर्व पुरावे ग्राह्य धरून दंडाधिकाऱ्यांनी पांचोलीला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
मी दहशतवादी नाही - पांचोली
मी दहशतवादी कृत्यात सहभागी नाही किंवा कोणताही बॉम्बस्फोट केलेला नाही. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा कठोर आहे. मी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देईन.
आदित्य पांचोलीवर २०१३मध्येही त्याचे शेजारी भार्गव पटेल यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पांचोलीने पटेललाही पार्किंग स्पेसवरूनच मारहाणर केली. तर
गेल्याच वर्षी एका पब बाऊन्सरला मारहाण
केल्याची केसही त्याच्यावर नोंदवण्यात आली आहे.
आवडते गाणे न लावल्याने त्याने पब बाऊन्सरला मारले. त्यापूर्वी त्याला त्याच्या आधीच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री पूजा बेदीच्या अल्पवयीन मोलकरणीवरही बलात्कार केल्याचा आरोप पांचोलीवर आहे.