एकनाथ शिंदेंवर टीका तर देवेंद्र फडणवीसांबाबत सहानुभूती; आदित्य ठाकरे कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:12 PM2022-11-04T15:12:54+5:302022-11-04T15:14:34+5:30

'पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आमचे वैर नाही, आम्ही त्यांचा आदर करतो.'

Aditya Thackeray | Criticism on Eknath Shinde, Sympathy for Devendra Fadnavis; Aditya Thackeray's statement | एकनाथ शिंदेंवर टीका तर देवेंद्र फडणवीसांबाबत सहानुभूती; आदित्य ठाकरे कडाडले...

एकनाथ शिंदेंवर टीका तर देवेंद्र फडणवीसांबाबत सहानुभूती; आदित्य ठाकरे कडाडले...

googlenewsNext

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. यातच, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना देशद्रोही म्हटले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.

'आमच्या काळात 6 लाख कोटींची गुंतवणूक आली'
या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकदाही निशाणा साधला नाही. मोदींचे आणि उद्धवजी ठाकरेंचे चांगले संबंध असल्याचे आदित्य म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारशी चांगला समन्वय होता, असेही आदित्य म्हणाले. दरम्यान, 'महाराष्ट्राच्या हातातून अनेक प्रकल्प निघून गेले. राज्यात असंवैधानिक सरकार आल्यापासून कोणीही गुंतवणूक करू इच्छित नाही. या लोकांना केंद्राशी योग्य समन्वय साधता येत नाही. आम्ही सरकारमध्ये असताना केंद्राने 6 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली,' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर केली.

'आम्ही नेहमीच PM मोदींचा आदर केलाय'
यानंतर आदित्य यांना जेव्हा विचारण्यात आले की, 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. ते भाजपसोबत जाऊ शकतात, असे त्यांच्याकडून तेव्हा सूचित करण्यात आले होते. त्यावर आदित्य म्हणाले की, 'पंतप्रधानांशी कोणाचेही वैर नाही. प्रत्येक घटनेला राजकारणाशी जोडता येत नाही. उद्धवजी दिल्लीला गेले आणि पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भेटले होते. लोकांच्या समस्या होत्या, काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. आमच्याकडून पंतप्रधानांबद्दल कधीही अपशब्द बोलले गेले नाहीत, आम्ही त्यांचा आदर करतो,' असे आदित्य म्हणाले.

'...तर फडणवीस मुख्यमंत्री असते'
या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे वक्तव्य केले. 'आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे, ते खूप अनुभवी नेते आहेत. ते या सरकारमध्ये सामील झाले, हे पाहून आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीसांची निंदा होते, ट्रोल केले जाते, हे पाहून वाईट वाटते. आज भाजप आमच्यासोबत असते, तर देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. आमच्यात निवडणुकीपूर्वी करार झाला होता. पण, कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच असेल,' असेही आदित्य म्हणाले.

Web Title: Aditya Thackeray | Criticism on Eknath Shinde, Sympathy for Devendra Fadnavis; Aditya Thackeray's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.