"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:13 PM2023-08-03T21:13:23+5:302023-08-03T21:13:48+5:30

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis over industries moving out of Maharashtra  | "गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले

"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले

googlenewsNext

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. खोके सरकारच्या नाकर्तेपणाची आणि उद्योगजगताचा सध्याच्या सरकारवर अजिबात विश्वास नसण्याची साक्ष देणारी 'श्वेतपत्रिका' आज प्रकाशित झाली असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला. तसेच महाराष्ट्राबाहेर गेलेले ४ मेगा प्रकल्प हा या श्वेतपत्रिकेचा विषय असून मविआ सरकारच्या काळात जे उद्योग व प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी अंतिम टप्प्यावरची चर्चा केली जात होती. तेच प्रकल्प बेकायदेशीर खोके सरकार येताच आणि त्यांच्या नेतृत्वाला भेटताच कसे महाराष्ट्रातून तळ हलवून बाहेर गेले ह्याचा हा ढळढळीत पुरावा आहे, असे ठाकरेंनी म्हटले. 

आदित्य ठाकरेंची बोचरी टीका 
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मिंधे-भाजपचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष आणि खोके सरकार स्थापन झाल्यावर उद्योग कसे दुसऱ्या राज्यात पाठवले गेले. गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रताप केल्याने, सद्य परिस्थितीवर उद्योग जगताचा कसा अजिबात विश्वास उरलेला नाही हे निदर्शनास आले. राज्यात दुर्दैवाने एक पूर्णपणे अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उद्योजकांच्या भेटींनंतर स्वहस्ते उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले. श्वेतपत्रिकेत वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन उद्योगांचा उल्लेख असताना, महाराष्ट्रापासून दूर ढकललेल्या इतर उद्योगांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. 

तसेच बल्क ड्रग पार्कबद्दलच्या उल्लेखावरून तर हे सिद्ध होते की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र हा सर्वतोपरी सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सर्वच्या सर्व ३ पार्क नाही, तरी किमान १ पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते. एकंदरीतच, हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता, की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा प्रश्न मला पडतोय. त्यांनी अधिकृतपणे मांडलेला रेकॉर्ड पाहता, दोघांनाही महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या मंत्रिमंडळात स्थानच मिळणार नाही, असेही आदित्य ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. 

ठाकरेंचा घणाघात 
"धोकेबाजीने सत्तेत आलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारमधले हे एक इंजिन तर पूर्णपणे फेल गेलेले आहे. तसंच, खोके सरकारने सांगितल्याप्रमाणे 'वेदांता फॉक्सकॉन' प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, त्या प्रकल्पाचा ह्या श्वेतपत्रिकेत उल्लेखही नाही. त्यात वेदांत फॉक्सकॉनच्या “फॉरवर्ड इंटिग्रेशन” प्रकल्पाचाही साधा उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते. तो प्रकल्प अजूनही सुरू आहे का?", अशा प्रश्न देखील त्यांनी विचारला. 

Web Title: Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis over industries moving out of Maharashtra 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.