मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:12 IST2025-01-20T14:12:13+5:302025-01-20T14:12:57+5:30
मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा
मुंबई - नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आलीय, हे नक्की काय चाललंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे. पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली आहे असं सांगत मंत्रिपद मिळवून देखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत हा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तणाव पाहता आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, पालकमंत्री पद, बंगले ह्यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत? जाळपोळ, दादागिरी मंत्र्यांचेच काही लोकं करणार आणि एवढी मोठी जबाबदारी स्थगित होणार? हा पॅटर्न आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आलीय!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 20, 2025
हे नक्की काय चाललंय?
मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे.
पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही…
त्याशिवाय दुसरीकडे बीड आणि परभणीची जनता न्यायासाठी आक्रोश करत असताना, ती जनता मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
पालकमंत्रिपदावरून तणाव
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. रायगडमध्ये आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्याने शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला. त्याशिवाय आमचा राजकीय अस्त झाला तरी तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे. विरोधकांनी या नाराजीवरून महायुतीला घेरले आहे. संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्याबाबत नवा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सामंत २० आमदारांना सोबत घेऊन भाजपात जाऊ शकतात असं विधान राऊतांनी केले त्यावर सामंतांनीही असं षडयंत्र करू नका, मी त्याला भीक घालत नाही असं प्रत्युत्तर दिले.