भाजपातील सर्वोच्च व्यक्तीला भेटायला आदित्य ठाकरेंनी वेळ मागितलीय; शिवसेनेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:55 PM2024-01-11T15:55:14+5:302024-01-11T15:55:48+5:30
उद्धव ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी शरद पवारांकडून घेतली आणि त्यात ते यशस्वी झाले असं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले.
ठाणे - शिल्लक सेनेचे नेते संजय राऊत आणि इतर सर्वजण सरबरीत झालेले आहे. त्यामुळे ते काहीही आरोप करतायेत. भाजपानंशिवसेना संपवण्याची सुपारी घेतलीय आणि त्यांच्या स्क्रिप्टनुसार दिल्लीतून हा निर्णय आला असं भाष्य ते करतायेत. परंतु त्यांचेच आदित्य ठाकरेभाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी वेळ मागतायेत असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना तुम्ही जाऊन विचारा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरिता वेळ मागितली आहे. त्या नेत्याने अद्याप आदित्य ठाकरेंना भेटायला वेळ दिली नाही. यावरून हे किती दुतोंडी आहेत हे स्पष्ट होते. एकीकडे भाजपावर टीका करायची आणि दुसरीकडे नववर्षाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने सर्वोच्च नेत्याला भेटायची वेळ मागायची असं दुतोंडी काम या लोकांचे सुरू आहे. इंडिया आघाडीला एकीकडे झुलवत ठेवायचे आणि दुसरीकडे भाजपासोबत जुळवण्याचा प्रयत्न करायचा ही दुतोंडी सापासारखी वर्तवणूक उबाठा गटाच्या नेत्यांची झाली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच श्रीकांत शिंदे हे स्वत:च्या कतृत्वावर, मेहनतीवर त्या मतदारसंघात काम करत आहेत. त्या मतदारसंघात केलेली कामे म्हणजे खासदार कसा असावा याचे तंतोतंत उदाहरण श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल त्यांच्या कामगिरीवर संसदरत्न पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्या कामावरती त्यांनी नाव बनवलं आहे. संजय राऊत यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत त्यामुळे ते काहीही बोलतायेत. शिवसेना संपवण्याची, उद्धव ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी शरद पवारांकडून घेतली आणि त्यात ते यशस्वी झाले असं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले.
लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव
लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.