"CM फडणवीसांविरोधात सरकारमधील कुणीतरी..."; नागपूर हिंसाचारावर आदित्य ठाकरेंची शंका
By प्रविण मरगळे | Updated: March 21, 2025 17:48 IST2025-03-21T17:47:47+5:302025-03-21T17:48:39+5:30
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न, गृह खातेही त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीये हे लोकांसमोर आले पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

"CM फडणवीसांविरोधात सरकारमधील कुणीतरी..."; नागपूर हिंसाचारावर आदित्य ठाकरेंची शंका
मुंबई - राज्यात घडणाऱ्या घडामोडी आणि त्यातून निर्माण होणारे वाद यावर बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. सरकारमधील कुणीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयत्न करतंय का हे शोधले पाहिजे असं विधान त्यांनी केले आहे.
नागपूर हिंसावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या शहराबद्दल आपण बोलतोय, त्या नागपूरमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येतात. जेव्हा पेटवा पेटवी होत होती, तेव्हा पोलीस उशिराने आले असं तिथले स्थानिक बोलतायेत. जेव्हा अशा घटना घडतात, ठिणगी पडते तेव्हा त्याचे इंटेलिजेंस रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकार बनल्यानंतर बीड असेल, परभणी असेल बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यात कधीतरी फोटो लीक होतात. माध्यमात काही गोष्टी येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काही रिपोर्ट येतात का हा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय कदाचित जे पेटवा पेटवी करतायेत. मंत्रिमंडळातील काही लोक असतील. मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री भाषण करतात. आपण किती मोठे आहोत. आपलं वाचन आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर ते बोलले. महाराष्ट्राचा मणिपूर करायचा. पेटवत ठेवायचे हा भाजपाचा प्रयत्न असेल. जे काही थोडे फार उद्योग महाराष्ट्रात येतायेत ती गुजरातला पाठवायची. शासन नसते, प्रशासन त्यांच्या हाती लागत नाही अशा राज्यात दंगली घडवायच्या आणि लोकांना त्यात व्यस्त ठेवायचं हे भाजपाचं काम असते. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न, गृह खातेही त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीये हे लोकांसमोर आले पाहिजे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असं नाही. काही तरी गडबड आहे. एकमेकांवर बऱ्याचदा टिकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे त्यांच्या युतीमधीलच कुणी फडणवीसांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय का याचा विचार केला पाहिजे असा आदित्य ठाकरेंनी दावा केला.
दरम्यान, बेरोजगारी, महागाई मुद्दा आहे. पाण्याची समस्या आहे. परंतु कुठेही सरकारला चटका बसू नये त्यासाठी ३५० वर्षापूर्वी घडलं त्यावर वाद काढायचा. केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार आहे, हिंमत असेल तर ती कबर काढा. युवकांना भडकावून दंगल घडवली जाते. नागपूर हिंसाचार घडत असताना मुख्यमंत्री कार्यालय, गृह खाते कुठे होते. सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडवायची हे किती योग्य आहे. जे जे मंत्री पेटवा पेटवी करतायेत. उपमुख्यमंत्री स्वत: जे २ वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून राहिले. कळत काही नाही, येत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. मतांचं राजकारण आहेच परंतु त्यांना महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय असा आरोप आदित्य यांनी महायुती सरकारवर केला.