Aditya Thackeray: "नीच आणि निर्लज्ज प्रकार..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 11:19 PM2022-10-08T23:19:48+5:302022-10-08T23:22:06+5:30
आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत शिंदे गटाला दिला इशारा
Aditya Thackeray reaction on Shiv Sena Symbol, ECI: खरी शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगाकडे होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागले आहे. तशातच, अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी १० तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव कोण वापरणार यावर अनेकविध चर्चांना उधाण आले होते. तशातच, आज निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवले असून अंधेरीच्या निवडणुकीत ठाकरे किंवा शिंदे गटाला हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक सूचक ट्वीट करत या प्रकाराला उत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाकडे असलेल्या या मुद्द्यावर आज निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तसेच, शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यावर आदित्य यांनी ट्वीट केले. "खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!", अशी भावना त्यांनी ट्वीटरवरून व्यक्त केली आहे.
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5
खरी शिवसेना कोणती? यावर अद्याप निवडणूक आयोगाला निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा हंगामी निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्काच मानला जात आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे आयोगाकडून तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं गेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यासोबतच, नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यावे लागणार आहेत.