"तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 04:05 PM2023-09-03T16:05:01+5:302023-09-03T16:06:51+5:30
जालन्यातील लाठीचार्ज घटनाचा निषेध करत शिंदे-फडणवीसांचा घेतला समाचार
Aditya Thackeray on Jalna Police Lathi Charge - Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी राज्यभर तीव्र असंतोष दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने, निषेधाचे मोर्चे, बंद, रास्ता रोको असे विविध प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून या घटनेतील जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहेत. तसेच अपर पोलिस अधीक्षक राहूल खाडे आणि डीवायएसपी यांच्या बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेत टीका केली आहे.
तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर...
"ही केवळ आरोप-प्रत्यारोपाची गोष्ट नाही. पोलिसांनी त्या ठिकाणी जमावावर, आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. हा घडलेला प्रकार आणि त्याच्या बातम्या साऱ्यांनी टीव्हीवर पाहिल्या आहेत. अतिशय भयानक असा लाठीचार्ज करण्यात आला. जणू काही आपल्या शत्रूवरच हल्ला केला जात आहे, अशा प्रकारचा लाठीचार्ज करायला लावला. मी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि एकंदर कार्यक्रम गेली दोन-अडीच वर्षे जवळून पाहिलं आहे. जेव्हा अशा संवेदनशील विषयात आंदोलन होत असतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना माहिती न देता कोणीही लाठीचार्ज करू शकत नाही. १०० टक्के याबद्दल सरकारला माहिती होती. म्हणूनच आज या खोके सरकारने राजीनामा देण्याची गरज आहे. त्यांना लाज असेल तर ते राजीनामा देतील," असे अतिशय रोखठोक मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
#WATCH | Mumbai: On Jalna lathi charge, Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray says, "We all have seen what happened in Jalna...The lathicharge was very brutal as if you are attacking your enemy...The protest was related to a sensitive issue...It is not possible that the police… pic.twitter.com/fETuRbNb0H
— ANI (@ANI) September 3, 2023
या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय मंडळीच नव्हे तर मराठी कलाकारही बोलते झाले आहेत. मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट करत जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. त्याने लिहिले आहे, "जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी… राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!"
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे आंदोलन आणि उपोषण करत असलेल्या आंदोलकांना शुक्रवार १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. हा लाठीमार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याच आदेशावरून झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. तसेच या प्रकरणी कागवाईची मागणीही होत होती. अखेर आज तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.