"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 06:09 PM2024-01-21T18:09:14+5:302024-01-21T18:09:37+5:30
गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला.
पिंपरी - तलाठी भरती घोटाळा पुढे आला. घोटाळा झाला तो झाला, पण २०० पैकी २१४ मार्क एका विद्यार्थ्याला मिळाले. त्यामुळे ज्याला एक खातं चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलंय असाच हा घोटाळा झालाय अशा शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवड येथे महानिष्ठा, महान्याय सभा आयोजित करण्यात आली होती. त्याठिकाणी आदित्य ठाकरेंनी सरकारवर घणाघात केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, आज राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही आहे. या कंपनीने त्यांचा करार रद्द केला आहे. कारण या कंपनीला तिथे कारखाना उभारायला सात वर्षे लागणार होती. त्यामुळे त्यांनी देशातूनच आता हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला.
तसेच या सभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पुनरुच्चार केला. २२ जानेवारीला अयोध्येत मोठा दिवस असून श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे . पण हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे. राज्यात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ असे हे म्हणाले होते . मात्र आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चा काढावा लागतोय, पण हे सरकार आरक्षण देऊ शकले नाही . या सरकारने रोजगार मिळवून देण्याचीही हमी दिली होती, महागाई हद्दपार करू म्हणाले होते. पण या प्रश्नांकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ ७० वर्षांपूर्वी त्यांनी काय केले? हेच विचारण्यात ते मश्गुल आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आता पुढे किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाही असं सांगत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.