भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:03 IST2024-12-08T15:00:44+5:302024-12-08T15:03:05+5:30

आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

Aditya Thackeray targets Samajwadi Party MLA Abu Azmi, MLA Rais Sheikh criticized to Uddhav Thackeray | भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई - जेव्हा तुम्ही आघाडीत येता तेव्हा किमान समान कार्यक्रम असतो. भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत जी मते त्यांना मिळाली ती कोणत्या समाजाची आहेत याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे. मिलिंद नार्वेकरांनी बाबरी घटनेवरून जे ट्विट केले त्यावर तुमची भूमिका काय हे बोलावे असा निशाणा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ठाकरे गटावर साधला आहे. अबु आझमी हे भाजपाची बी टीम आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती त्यावर रईस शेख यांनी उत्तर दिले.

आमदार रईस शेख म्हणाले की, महाविकास आघाडी ही पुरोगामी विचारांवर निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांना जतन करायचे आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी जे ट्विट केले त्यावर आधी खुलासा करावा. ए टीम, बी टीम मला त्यावर भाष्य करायचं नाही. नाना पटोलेंसोबत माझं बोलणं झालं आहे. जी भूमिका मिलिंद नार्वेकरांनी घेतली त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह ठाकरेंची भूमिका काय आहे ते महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते भाजपाची बी टीम म्हणून काम करतात. अखिलेश यादव त्यांची लढाई लढतात परंतु इथले नेते भाजपाची बी टीम असल्याचं वागतात. हे आम्ही आधीही पाहिलं आहे. या निवडणुकीत मला बोलायचं नाही, त्यांनी कुणाची मदत केली, कशी मदत केली हे माहिती आहे. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही. आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहे. महाविकास आघाडीतील ए टीम, बी टीम यांनी आम्हाला शिकवू नये. हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, पारसी बुद्धिस्ट असो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले आहे आणि यापुढेही करत राहू असं सांगत आदित्य ठाकरे यांनी अबु आझमी यांना टार्गेट केले. 

"...म्हणून मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय"

समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असं अबु आझमी यांनी म्हटलं आहे.

Web Title: Aditya Thackeray targets Samajwadi Party MLA Abu Azmi, MLA Rais Sheikh criticized to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.