नाईट लाईफवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने? आदित्य ठाकरेंचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 09:16 PM2020-01-19T21:16:36+5:302020-01-19T21:27:24+5:30
कॅबिनेटमध्ये प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल; गृहमंत्री अनिल देशमुखांचं विधान
मुंबई: राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा नाईट लाईफबद्दलचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबद्दलच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. गृहमंत्र्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबद्दल घेतलेल्या निर्णयाची प्रजासत्ताक दिनापासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र अनिल देशमुखांच्या विधानामुळे हा निर्णय लागू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. पोलीस १२ पेक्षाही जास्त तास काम करत आहेत. त्यामुळे नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा इतक्या कमी वेळेत तयार होणार नाही. नाईट लाईफसाठी आवश्यक असणारे अतिरिक्त पोलीस आहेत का, याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतरच याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं देशमुख म्हणाले.
देशमुख यांनी केलेल्या विधानामुळे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफच्या निर्णयाची घोषणा करताना घाई केली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आदित्य यांच्या निर्णयाचं महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी स्वागत केलं होतं. मात्र देशमुख यांच्या विधानामुळे नाईट लाईफची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होण्याची शक्यता मावळली आहे.
मुंबईत २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार शहराच्या अनिवासी भागातील सर्व चित्रपटगृहं, मॉल्स, रेस्टॉरंट्स २४ तास सुरू राहतील. नरिमन पॉईंट, बीकेसी, कमला मिल, काला घोडा या भागांमध्ये नाईट लाईफ सुरू होणार आहे.