मोदी जे पितात तेच ड्रिंक आदित्य ठाकरेंच्या पेल्यात; राऊतांनी पुन्हा मकाऊवरून टोले हाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:27 AM2023-11-21T11:27:01+5:302023-11-21T11:28:10+5:30
या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. - संजय राऊत
काल मी एक ट्विट केले, त्याद्वारे एक फोटो प्रसिद्ध केला. मी त्यात कोणता पक्ष नेता, संघटना याचे नाव घेतले नाही. महाराष्ट्रातील जवाबदार व्यक्ती चीनच्या मकाऊ येथे जुगार खेळत होता, तिथे पिझ्झा खायला कोणी जात नाही. या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. भाजपने हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, असा टोला संजय राऊत य़ांनी लगावला आहे.
काल रात्री मला कळाले की त्यांनी पोकर तिथे घेतले. ते काय असते हे मी समजून घेतले. साडे तीन कोटीचे पोकर घेतले त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात कुटुंब कुठेही दिसत नाही. लंडनला आमदाराचे शिष्टमंडळ गेले, आमदारांना वाटलं अशाप्रकारच्या जागेचा अभ्यास करावा, असा टोला राऊतांनी भाजपा आणि बानवकुळेंना लगावला.
आदित्य ठाकरे जे पीत आहेत ते डाएट कोक आहे. मोदी जे पितात तेच कोक आदित्य ठाकरे पितात. ईडी सीबीआय पोलीस असताना भाजप इतका का घाबरला? असा सवाल राऊतांनी केला. याचबरोबर आम्ही मानसिक रुग्ण आहोत. आपल्या सारख्या व्यक्तीपासून महाराष्ट्र वाचवायचा ही आमची मानसिकता आहे. दंगल घडवण्याची मानसिकता यांची आहे. लोकांना नैतिकतेच्या गोष्टी करणारी ही भारतीय जुगार पार्टी आहे. भाजप भ्रष्ट पार्टी आहे. निवडणूक अधिकारी, विधानभवन राष्ट्रपती हे काही करणार नाहीत. हे भाजपचे पोपट आहेत. यांच्या पाठीचा कणा मोडलाय. हे वरून आलेल्या आदेशाचे पालन करतात, असा आरोप राऊत यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष स्वत: वकील आहेत. त्यांना योग्य अयोग्य कळत नाही का? घटनाबाह्य सरकारला पाठींबा देत आहेत. ते घटनात्मक पदावर बसले आहेत. पंतप्रधान मोदी सांगतात पवारांनी ७० हजार कोटीचा घोटाळा केला,पण त्या पवारांना मोदी मांडीवर घेऊन बसलेत. यावरून दिसते कोण मनोरुग्ण आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, असे फडणवीस यांचे झाल्याचा टोला राऊतांनी हाणला.
मुख्यमंत्र्यांनी मुंबई साफ करावी, नाहीतर लवकरच महाराष्ट्राची जनता त्यांना साफ करेल. कलानगर येथून सुरूवात केलीय, कारण कलानगरवर त्याचे प्रेम आहे. सर्व काही कलानगरनेच दिलेय त्यांना, हे ज्या खुर्चीवर बसलेत तेही कलानगरचीच बदोलत. मुंबईसह महाराष्ट्र ज्या अदानीच्या घशात घालू इच्छितात त्याला आम्ही विरोध करतोय. धारावी तसेच मराठी माणसाला बेघर करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले.